ठाणे : ठाणे महापालिकेने महिलांच्या आणि महापालिका शाळेत जाणाऱ्या मुलींच्या ‘त्या’ दिवसांची काळजी घेण्यासाठी शहरातील सार्वजनिक शौचालये आणि महापालिकांच्या शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीन व्हेण्डिंग मशीन बसवल्या होत्या. त्यातील अनेक मशीन बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे ज्या ठेकेदाराला हे काम दिले होते, त्याचे संपूर्ण बिल मात्र अदा करण्यात आले आहे. यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाईची मागणी भाजपच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केली आहे.ठाणे महानगरपालिकेने समाजविकास विभागामार्फत २०१७-१८ मध्ये (विनामूल्य) सॅनिटरी नॅपकीन व्हेण्डिंग मशीन बसवण्यासाठी मे. फराडे ओझोन या कंपनीस काम दिले होते. या कामासाठी महापालिकेने या कंपनीस ३० जून २०१७ रोजी वर्कआॅर्डरही दिली होती. महापालिकेने या कामाचे देयकसुद्धा कंपनीस दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.मात्र, सद्य:स्थितीत संपूर्ण महापालिका हद्दीतील ठामपाच्या १६३ सार्वजनिक शौचालयांतील १२९ मशीन बंद असल्याची माहिती त्यांनी दिली. तर, १२७ महापालिका शाळांमधील २५ मशीन बंद असून १२ मशीन विद्युतपुरवठा अथवा तांत्रिक कारणास्तव बंद असल्याची माहिती समोर आली आहे.मशिन्स पुन्हा सुरू करा!कोट्यवधीचे कंत्राट देताना निविदेतील अटी व शर्तींकडे लक्ष दिले जाते का, याची माहिती कोण घेणार, असा सवालही त्यांनी केला आहे.या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याबरोबरच मशीन पुन्हा सुरू करण्याची मागणीही पेंडसे यांनी केली आहे.
शाळा, शौचालयांतील सॅनिटरी नॅपकीन व्हेण्डिंग मशिन्स बंद, दोषींवर कारवाई करा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 1:22 AM