स्टार ११४२
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : देशभरात लांबपल्ल्यांच्या एक्स्प्रेस मोठ्या संख्येने सुरू असल्या तरी अजूनही त्या स्पेशल ट्रेन नावानेच धावत आहेत. त्यामुळे या गाड्यांसाठी जास्तीचे भाडे आकारले जात आहे. त्याचवेळी जनरल डबे अजूनही बंद आहेत. त्यामुळेही प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनलॉक झालेले असताना विशेष ट्रेन बंद करून कोरोनाकाळापूर्वी जशा ट्रेन धावत होत्या तशा पुन्हा सुरू कराव्यात. त्यामुळे तिकीटही कमी होईल, अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
विशेष गाडीमुळे प्रत्येक प्रवाशाकडून आरक्षित तिकिटासाठी सुमारे १०० हून अधिक रुपये जास्तीचे आकारले जात आहेत. त्याचा फटका सामान्यांना बसत आहे. सध्या गणेशोत्सवासाठी कोकणात गावाला किंवा अन्यत्र जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे; परंतु जादा तिकिटामुळे प्रवासी नाराज आहेत. सगळे काही पूर्ववत झाले असल्याने तातडीने रेल्वे सेवा पूर्वीच्या दरात सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
----------
सध्या सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन
- उत्तरेकडे दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार राज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्या
- महाराष्ट्रांतर्गत नागपूर, औरंगाबाद, नांदेड जाणाऱ्या गाड्या
- दक्षिणेकडे चेन्नई, तिरुपती, हैदराबाद, सोलापूर, कोल्हापूर आदी ठिकाणी जाणाऱ्या ट्रेन
- कोकणात गणेशोत्सवानिमित्त सोडण्यात येणाऱ्या विशेष ट्रेन
----------------
दुप्पट भाडे कधीपर्यंत सहन करणार?
एक्स्प्रेस आणि स्पेशल ट्रेनच्या भाड्यात चांगलीच भाववाढ होते. उदा. पुण्याला जाण्यासाठी पूर्वी गाड्यांना ९० ते ११० रुपये तिकीट पडत होते. मात्र, विशेष गाडी असेल तर ते तिकीट सुमारे २०० रुपयांपर्यंत जाते.
--------------------
जनरल डबे कधी होणार अनलॉक?
अनेक गाड्यांना अजूनही जनरल डबे जोडलेले नाहीत. ते जोडावेत, जेणेकरून ज्यांना आरक्षण तिकीट मिळणार नाही, ज्यांना परवडणार नाही अशा प्रवाशांना या डब्यांतून प्रवासाची मुभा मिळेल आणि ते इच्छितस्थळी जाऊ शकतील. पॅसेंजर गाड्याही तातडीने सुरू व्हायला हव्यात, जेणेकरून प्रवासी निदान त्या गाड्यांमधून परवडणाऱ्या दरात प्रवास करतील.
----------------------------
स्पेशल ट्रेनचे भाडे कसे परवडणार?
कोरोनाकाळात आधीच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्पेशल ट्रेनचे तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे नाही. कारण या ट्रेनसाठी मूळ तिकिटापेक्षा जास्त पैसे घेतले जातात. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने आता त्या ट्रेन बंद करून सामान्यांना दिलासा द्यावा, ही प्रवाशांच्या वतीने विनंती.
- मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्था.
--------------