लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : जास्तीचे तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटातील अल्सर होऊ शकतो, तसेच वेळेत जेवण न केल्यास आणि तंतुमय पदार्थ न खाल्ल्यास अल्सरचा धोका येऊ शकतो. त्यामुळे बदलत्या आणि धावपळीच्या जीवनात शरीराकडे लक्ष देणे अत्यावश्यक असून, त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषत: मद्यपान आणि मांसाहारी अन्नपदार्थ जास्त प्रमाणात सेवन करणाऱ्यांनी सावध असायला हवे, असे तज्ज्ञ सांगतात.
अल्सर दोन प्रकारचे असतात पोटाचा आणि आतड्याचा. त्या सगळ्याला खाणपिण्याच्या सवयी कारणीभूत असून, त्याची नियमानुसार काळजी घेतली की सगळे आपोआप सुरळीत होते. जेवणानंतर किमान १५ मिनिटे चालायला जाणे किंवा लगेचच बिछान्यावर न जाणे याबाबी अत्यावश्यक असल्याचे सांगण्यात आले. मनुष्याचा आळस हा त्याच्या देहावर विपरीत परिणाम करत असून, आळस सोडणे खूप महत्त्वाचे असल्याचे सांगण्यात आले.
----------
काय आहेत अल्सरची लक्षणे-
पोट दुखणे
उलट्या होणे
भूक मंदावणे
वजनात अचानक घट होणे
उलटीतून रक्त पडणे
सतत ढेकर येणे
जेवणाची इच्छा न होणे
मळमळणे
संडासला जास्त होणे
बद्धकोष्ठता येणे
--------------
काय काळजी घेणार
तिखट, मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
आहारात तंतुमय पदार्थ म्हणजे मुळा, गाजर, बीट, काकडी खा.
दुपारच्या आहारात फळ आवर्जून खा.
रात्रीचा आहार कमी घ्यावा.
सकाळचा नाश्ता पुरेसा घ्यावा.
डॉक्टरच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावा.
--------------------------
पौष्टिक आहार हाच महत्त्वाचा असून, सातत्याने जेवणाच्या वेळा बदलणे, मसालेदार पदार्थ अतिखाणे, अतिधूम्रपान, मद्यपान करणे टाळावे, तसेच खूप गरम पाणी पिण्यापेक्षा कोमट पाणी पिणे गरजेचे आहे. जेवण झाले की घरातल्या घरात चालावे. तसे न केल्यास अल्सरची शक्यता असते. वेळीच काळजी घेणे गरजेचे असते.
-तज्ज्ञ डॉक्टर