ठाणे – मुंब्रा येथील ठाकरे गटाच्या शाखेवर बुलडोझर फिरवल्यानं आता उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे स्वत: याठिकाणी जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. ठाकरेंसोबत संजय राऊतही असतील. उद्धव यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शाखेच्या १०० मीटर परिसरात नेते आणि कार्यकर्त्यांना बंदी असून पोलिसांनी खबरदारी म्हणून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीसही बजावली आहे. आता या प्रकरणात मुंब्रा कळवाचे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेत सत्ताधारी शिवसेनेला इशारा दिला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाण्यात पोलिसांचे अस्तित्व नाही, जसा आदेश येतात तसे ते वागतात. ठाकरेंचे स्वागत करायचे नाही असं पोलीस सांगतात, हे सगळं जनता बघतेय. मी पोलिसांशी बोललो होतो, स्वागताचे बॅनर फाडले गेले. मला टार्गेट करेल याचा कुणी मी विचारही करत नाही. उद्धव ठाकरेंना मुंब्र्यात येऊ देणार नाही असं स्वत: मला डीसीपी म्हणाले होते, हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंना अडवून दाखवा असा इशारा त्यांनी दिला.
त्याचसोबत वरिष्ठ अधिकारी आपल्या अंगावर काही घेत नाही. खालचे पोलीस मरतात. ती शाखा शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय होतं. ३ दिवसापर्यंत ही शाखा ठाकरे गटाकडे होती. विजय कदम नावाच्या शिवसैनिकाच्या नावावर सगळे चेक, बील, टॅक्स जातात. विजय कदम हा कडवट आहे. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे ठाण्यात आले, तेव्हा मी स्वागताला गेलोय. मी त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलंय, त्यांच्या स्वागताला जाणं ही आमची संस्कृती आहे असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.
काय आहे जितेंद्र आव्हाडांचा आरोप?
मुंब्रा परिसरामध्ये काल रात्री बॅनर्स फाडण्यात आले. पोलीसांना सूचना देऊनही पोलीस काहीच करु शकले नाहीत. या घडामोडीत पोलीसांचाही यामध्ये हात होता. आता पोलीसांना मी ज्या गाडीतून बॅनर्स फाडणारे आले होते, त्या गाडीचा नंबर देत आहे. MH43 1278, आता बघुयात पोलीस ही गाडी शोधतात का? आणि गाडी कोण चालवत होतं याची नोंद घेतात का? आणि त्यांच्यावर कारवाई करतात का? असा निशाणा पोलिसांवर साधला.
त्याचसोबत ह्याला थांबवा, त्याला थांबवा…मुंब्रा परिसरामध्ये घबराटीचे वातावरण तयार करा. दहशतीचे वातावरण तयार करा. हे करण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे गरजेचे आहे ते पोलिसांनी करावं. ती गाडी कोणाची आहे याचा आता शोध घ्या असं आव्हान जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांना केले आहे.