भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेत ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या संगणक चालकांना सेवेत कायम करण्याचा ठराव मे २०१७ मधील महासभेत मंजुर करण्यात आला. मात्र हा ठराव रद्द करण्यासाठी प्रशासनाने राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केल्याविरोधात त्या संगणक चालकांनी सोमवारपासुन बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
पालिकेने २००३ मध्ये संगणक चालकांची कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती केली. यांनंतर त्यांना २००७ मध्ये प्रशासनाने ठोक मानधन पद्धतीनुसार पालिका आस्थापनेवर घेतले. त्यांना सेवेत कायमस्वरुपी सामावुन घेता येऊ नये, यासाठी प्रशासनाकडुन त्याच्या कार्यात एक दिवसांचा खंड देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कंत्राटी व तद्नंतर ठोक मानधनावर कार्यरत असलेल्या संगणक चालकांनी प्रशासनाला कायमस्वरुपी सेवेत सामावुन घेण्यासाठी सतत पाठपुरावा सुरु केला. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नाही. अखेर १९ मे २०१७ रोजीच्या महासभेत त्यांच्या कायमस्वरुपी सेवेत सामावुन घेण्याच्या ठरावाला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. यानंतर प्रशासनाने त्यावेळच्या महापौर गीता जैन यांना कोणतीही माहिती न देता पालिकेकडे आर्थिक तरतुद नसल्याच्या कारणास्तव तो मंजुर ठराव रद्द करण्यासाठी परस्पर राज्य सरकारकडे पाठविला. त्याची माहिती संगणक चालकांना मिळताच त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली. त्यातच त्यांना २०१५ पासुन सुरु करण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम देखील त्यांच्या खात्यात अद्याप जमा केली जात नसल्याचे समोर आले आहे. त्यांना वर्षातून १५ दिवसांची भरपगारी रजा मंजुर करण्यात आली असतानाही त्याचा लाभ अद्याप दिला जात नाही. भविष्य निर्वाह निधी संगणक चालकांच्या खात्यात जमा करण्यासह १५ दिवसांच्या भरपगारी रजेचा लाभ त्वरीत देण्यात यावा. यासह त्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावुन घेण्याचा मंजुर ठराव रद्द न करता प्रशासनाने गेल्या १५ वर्षांपासुन संगणक चालक पदावर काम करणाय््राांना न्याय द्यावा, या मागणीसाठी ६८ संगणक चालकांनी सोमवारपासुन आ. नरेंद्र मेहता प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहे. यामुळे पालिकेतील नागरी सुविधा केंद्रातील कर वसुली व जन्म-मृत्यु नोंदणीची कामे ठप्प झाली आहेत.
- सोमवारपासुन सलग तीन दिवस पालिकेचे स्वच्छता सर्व्हेक्षणासाठी केंद्रीय पथक आले असताना संगणक चालकांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनामुळे आ. नरेंद्र मेहता व आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्यातील वाद पेटत असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे. तसेच या संगणक चालकांचे नेतृत्व देखील आ. मेहता यांच्या संघटनेमार्फत होत असल्याने तर्कवितर्कांना ऊत आला आहे. परंतु, संगणक चालकांची मागणी रास्त असल्याने प्रशासनाने त्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावुन घ्यावे, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाय््राांनी केली आहे.