कल्याण : केडीएमसी प्रशासनाकडून लसीकरणाचा खो-खो सुरू आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत असल्याने लसीकरणात सुसूत्रता आणावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
राज्यात कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा आरोग्याच्या सोयी-सुविधा अपुऱ्या होत्या. केडीएमसी हद्दीत जंबो कोविड सेंटर, चाचणीसाठी लॅब सुरू करण्यात आली. दुसऱ्या लाटेत रुग्णालयात खाटा, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन तुटवडा भासला, तर, दुसरीकडे लसीकरण सुरू झालेले असताना केंद्राकडून राज्याला लस कमी प्रमाणात मिळत आहे. मनपा हद्दीची लोकसंख्या २० लाखांच्या आसपास असताना, मनपास दररोज एक हजार डोस मिळतात. अशी स्थिती असेल, तर कोरोनाशी मुकाबला कसा करणार, असा प्रश्न पाटील यांनी विचारला आहे.
४५ पेक्षा अधिक वयोगटाचे लसीकरण सुरू असतानाच, सरकारने १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण सुरू केले. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना गर्दीचा सामना करावा लागतो. तर, तरुणांना लसीकरणासाठी एकच केंद्रे असून, तेथे ऑनलाइन नोंदणीशिवाय लसीकरण केले जात नाही. सध्या मनपा हद्दीतील १७ केंद्रांपैकी केवळ तीन केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. त्यामुळे अशा गतीने लसीकरण केल्यास तिसरी लाट येऊन गेली, तरी लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले.
... हे राजकारण नाही, तर काय?
- ठाणे मनपास गुरुवारी लसीकरणासाठी तीन हजार डोस मिळाले आहेत, तर दुसरीकडे केडीएमसी हद्दीत एकाच केंद्रावर लसीकरण होणार आहे.
- कल्याण पूर्व आणि डोंबिवलीला एकही डोस मिळालेला नाही. एकीकडे राजकारण करू नका, असा सल्ला देतात. मग हे राजकारण नाही, तर काय? असा टोला पाटील यांनी लगावला आहे. या संदर्भातील ट्वीट त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यालय, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्र्यांना केले आहे.
-----------