मीरारोड - हवामान खात्याने समुद्रात 31 मे ते 4 जून दरम्यान वादळाचा इशारा दिल्याने हंगामाची शेवटची मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेल्या बोटींना परतण्यास सांगण्यात आले आहे. भाईंदरच्या उत्तन भागातील अनेक बोटी मासेमारीसाठी गेल्याने त्या वादळा आधी परतण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
हवामान खात्याने ठाणे , मुंबई व पालघर आदी अरबी समुद्र किनाऱ्यावरील जिल्ह्याना 31 मे ते 4 जून या दरम्यान समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन वादळ व वादळी वारे वाहण्याचा इशारा दिला आहे . त्या अनुषंगाने मच्छीमारांना समुद्रात मासेमारी साठी जाऊ नये व जे मासेमारी साठी गेले असतील त्यांनी त्वरित परत यावे त्यासाठी मच्छीमार संस्थांना कळवण्यात आले आहे . वेळेत परंतु न शकणाऱ्या मच्छीमार बोटींनी जवळच्या बंदरात वादळ जाई पर्यंत आश्रय घ्यावा असे सांगण्यात आले आहे . मच्छीमार संस्थांनी देखील मच्छीमाराना वादळाची माहिती देऊन समुद्रात जाऊ नये तसेच गेलेल्या मच्छीमारांशी संपर्क करून परतण्यास सांगितले आहे .
आधीच मच्छीमारांचा यंदाचा हंगाम सुरवाती पासूनच पाऊस व वादळांमुळे वाया गेला. मासेमारी कुठे नीट सुरू होईल, असे वाटत असताना गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनामुळे मोठे नुकसान झाले. 31 मेपासून अशीपण मासेमारी बंद होणार आहे. पण निदान हंगामाच्या शेवटच्या फेरीत मासे मिळतील अशी आशा मच्छीमारांना होती. पण आता वादळाच्या इशाऱ्याने हंगामाचा शेवट देखील निराशाजनक ठरल्याचे मच्छीमार नेते बर्नड डिमेलो म्हणाले. यंदाचा मासेमारी हंगाम अतिशय नुकसानीचा गेला आहे. पण सरकार कडून मदत मिळाली नाही. मच्छीमारांना कोणी वाली नाही अशीच भावना बळावली असल्याचे त्यांनी सांगितले.