मुरबाड : तालुक्यातील वाल्हीवरे व परिसराला चक्रीवादळाचा फटका बसला आहे. तेथील सरकारी आदिवासी आश्रमशाळेचे पत्रे उडाले आहेत. सध्या शाळा बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच त्या परिसरातील अनेक घरांवरील छप्पर वाऱ्यामुळे उडून गेले आहे. अनेकांच्या घरांत पावसाचे पाणी आल्याने त्यांचे अतोनात हाल झाले.
मुरबाड तालुक्यात गारांचा पाऊस झाला होता. त्यावेळीही ग्रामस्थांचे नुकसान झाले होते. त्यानंतर रविवारपासून तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम पाहायला मिळाला. वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी बसरल्या. वाऱ्यामुळे वाल्हीवरे परिसरातील घरांचे छप्पर उडाले. आश्रमशाळेचेही नुकसान झाले. सोमवारी सायंकाळपर्यंत या परिसरात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. अवघ्या १५ दिवसांत दोन वेळा निसर्ग कोपल्याने स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
--------------