बदलापूर : बदलापूर नगरपालिकेत ६ मे रोजी झालेल्या बैठकीत ८ मे पासून कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची चर्चा शहरात झाल्याने नागरिकांनी शुक्रवारी बाजारपेठेत खरेदीसाठी तुफान गर्दी केली. लॉकडाऊन करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात येणार असून तिचे आदेश अद्याप पारित केलेले नाहीत. त्यामुळे बदलापुरात नेमका लॉकडाऊन होणार की नाही याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.
कुळगाव बदलापूर नगरपालिकेत ६ मे रोजी आमदार किसन कथोरे यांनी कोरोना संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत बदलापुरातील कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुरबाड प्रमाणे बदलापूर शहरात देखील कडक लॉकडाऊन लावण्या संदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने करावी अशा सूचना देखील दिल्या. या बैठकीनंतर लागलीच शहरात कडक लॉकडाऊन लागणार अशी चर्चा रंगली. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून बदलापुरातील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांनी तुफान गर्दी केली. दुकानात नागरिकांची गर्दी असल्याने एका आठवड्याचा लॉकडाऊन लावण्या आधीच खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे शनिवारपासून लागणाऱ्या लॉकडाऊन अद्याप निश्चित केला नसून बदलापूर पालिकेने शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून शनिवारपासून पुढचे सात दिवस कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी केली आहे. मात्र, पालिकेच्या या पत्राला अद्याप कोणतेही उत्तर आलेले नसून शनिवारचे लॉकडाऊन निश्चित मानले जात नाही.
पालिका स्तरावर लॉकडाऊन घेण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेणे योग्य नसल्याचे मत शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भातील ठोस निर्णय जिल्हाधिकारी पातळीवर होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी देखील पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून लॉकडाऊन जाहीर केल्यास त्याला योग्य ते सहकार्य करण्याची भूमिका राहील असे स्पष्ट केले.