ठाणे : वाचन संस्कृतीचा होत जाणारा ह्रास लक्ष्यात घेता अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी वाचन संस्कृती टिकून रहावी म्हणून वाचक कट्ट्याची निर्मिती केली. वाचक कट्टयावर तरुण साहित्यिक सुमेध समर्थ याने "आता आमोद सुनांसि आले" या कथेचे अभिवाचन करत रसिकांची मने जिंकली. यंदाचा हा २० क्रमांकाचा कट्टा होता.
लघुकथाकार दिगंबर कृष्ण मोकाशी यांची हि कथा आहे. या कथेचे वाचन करताना सुमेधने एक गाव,त्या गावात तुफान पडणारा पाऊस,पूर,पुरात वाहून गेलेला रामजीचा तरुण छोकरा, सन्तु वाण्याचे दुकान,ज्ञानेश्वरी वाचणारे जोशी,शिवा नेमाणेची कष्टाळू बायको आणि गोठ्यात वासारामुळे अडलेली गाय तसेच या सगळ्यांना जोडते ती ज्ञानेश्वरी मधलं ज्ञान अज्ञान भेद प्रकरणं इत्यादी गोष्टी या कथेत मांडण्यात आल्या. स्वराली दामले हि ने सहकलाकार म्हणून काम केले.स्वरालीने आपल्या सुमधूर आवाजात पसायदान सादर करत कार्यक्रमास अध्यात्म्याची जोड दिली. हा कार्यक्रम ऐकत असताना आम्ही कथा ऐकतोय असे वाटत नसून,आम्ही प्रत्यक्ष त्या घटनेच्या ठिकाणीच आहोत की काय असे जाणवले, असे एका प्रक्षकाने सांगितले. यावेळी शुभांगी भालेकर,मौसमी घाणेकर,वैभव चव्हाण,ओमकार मराठे,धनेश चव्हाण,कुंदन भोसले,उत्तम ठाकूर,माधुरी कोळी, अमित महाजन, सहदेव कोळंबकर,न्यूतन लंके,साक्षी महाडिक या कट्ट्याच्या कलाकारांनी देखील अभिवाचन केले. या कार्यक्रमाचे निवेदन आरती ताथवडकर यांनी केले.दिपप्रज्वलन अनुराधा नामजोशी यांनी केले.