भिवंडी: भिवंडी महानगरपालिका प्रशासनाचा अजब कारभार समोर आला आहे.क्रिकेट क्रीडा स्पर्धांसाठी असलेले धोबी तलाव येथील कै. परशुराम टावरे स्टेडियममध्येच महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणाने क्रीडा स्पर्धा ऐवजी चक्क जत्रा भरविण्यासाठी स्टेडियम भाड्याने दिले असल्याचा प्रकार समोर आले आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या धोबितलाव येथे कै परशुराम टावरे स्टेडियम उभारले आहे. या क्रीडांगणावर क्रिकेटसह इतरही क्रीडा स्पर्धा भरविण्यात येत असतात.सध्या शाळांना सुट्टी असल्याने मुलांचा ओढा या क्रीडांगणा कडे आहे. परंतु या स्टेडियमवर २३ ते २८ दरम्यान चक्क जत्रा भरवायला प्रभाग समिती क्रमांक चारच्या वतीने परवाणगी देण्यात आली आहे.
यासाठी प्रतिदिन दोन हजार रुपये भाडे आकारून अल्ताफ निजामुद्दीन शेख ऊर्फ अल्ताफ बाली या खाजगी व्यक्तीस भाडेतत्त्वावर जत्रेच्या खेळण्यासाठी हे स्टेडियम महापालिकेने दिले आहे.या ठिकाणी कोणतीही सुरक्षा ,आपत्कालीन व्यवस्था न ठेवता आकाश पाळणे ,जत्रेतील खेळ,खाऊ, खेळणीची दुकाने, फास्टफुड अशी दुकाने थाटली आहेत. क्रिकेट मैदानावर अशा पद्धतीने जत्रा भरविल्याने शहरातील नागरिकांनी पालिका प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे.
यासंदर्भात मनपा आयुक्तांशी फोनवर संपर्क साधला असता आयुक्तांनी फोनला प्रतिसाद दिला नाही.तर हे क्रीडांगण यापूर्वीदेखील जत्रा भरविण्यासाठी भाडेतत्त्वावर दिले होते याची खातरजमा करून प्रतिदिन दोन हजार भाडे आकारून परवानगी देण्यात आली होती मात्र महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या निर्देशानुसार सदर जत्रेची परवानगी सोमवारी सायंकाळी रद्द करण्यात आली आहे अशी माहिती प्रभाग समिती क्रमांक चारचे प्रभारी सहाय्यक आयुक्त गिरीश गोष्टेकर यांनी दिली आहे.