ठाणे - अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे निलंबित आमदार यांनी ठाणे कारागृह प्रशासनाविरोधात खबळजनक आरोप केला आहे. ठाणे कारागृह प्रशासनाने एका कैद्याला मारहाण करून मानवी विष्ठा खायला लावली असल्याचा गंभीर आरोप कदम यांनी केला आहे. याबाबत त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली असून या तक्रारीची दखल घेत आयोगाने कारागृह प्रशासनाकडे समन्स पाठविले आहे, असा दावा कदम यांनी केला आहे.
ठाणे कारागृहात २७ जून रोजी कैद्याला काही कारागृह कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आणि मानवी विष्ठा खाण्यास जबरदस्ती केली, असा आरोप रमेश कदम यांनी केला आहे. यानंतर प्रकरणाला वाच्या फोडण्यासाठी कदम यांनी मानवाधिकार आयोगाला पत्र लिहिले आहे. याची दखल घेत मानवाधिकार आयोगाने ठाणे कारागृह प्रशासनाला समन्स पाठविले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती कदम यांनी केली आहे. संबंधित जेलर आणि अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचा इशारा कदम यांनी पत्रात नमूद केला आहे.
अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील जवळपास वीस लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी अटक असलेले काँग्रेसचे निलंबित आमदार रमेश कदम यांना आर्थिक गुन्हे शाखेने पहिल्यांदा आर्थर रोड कारागृहात, नंतर भायखळा कारागृहातून आता ठाणे कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.