अजबच की... एकही किमी न धावलेल्या घंटा गाडी दुरुस्तीसाठी 1 कोटी 6 लाखांची निविदा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2021 02:52 PM2021-05-10T14:52:06+5:302021-05-10T14:52:58+5:30
एकही किलोमीटर न चाललेल्या गाड्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळण कशाला , काँग्रेस नगरसेवकांचा सवाल
नितिन पंडीत
भिवंडी - भ्रष्टाचार व स्वच्छतेच्या अभावासह शहरात मूलभूत समस्या पुरविण्यास अपयश येत असल्याने सतत चर्चेत असलेली भिवंडी महापालिका नव्या घंटा गाड्या खरेदीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता, याच नव्या घंटा गाड्या रस्त्यावर एकही किलोमीटर न चालता या नव्या घंटा गाड्यांच्या निगा व दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल एक कोटी सहा लाख वीस हजार रुपये किंमतीची निविदा काढली आहे. विशेष म्हणजे नव्या घंटा गाड्या खरेदी करून त्या एकही किलोमीटर शहरात धावल्या नसतांनाही या घंटा गाड्यांच्या निगा व दुरुस्तीसाठी कोटींची निविदा काढल्याने काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत या निविदेसह मनपा प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारावर जोरदार ताशेरे ओढले आहे.
शहरातील ओला आणि सुका कचरा उचलण्यासाठी पालिकेने तब्बल ५० घंटागाड्या मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात खरेदी केल्या आहेत. सुमारे ३ कोटी २५ लाख रुपये खर्च करून या नव्या कोऱ्या घंटा गाड्या मनपा प्रशासनाने खरेदी केले आहेत. या गाड्यांना खरेदी करून आज वर्ष उलटूनही या घंटागाड्या वापरात न आल्याने कोंबडपाडा येथील भांडारगृहात धूळ खात पडल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या मालकीच्या कोट्यवधी रुपये खर्च करून ५० घंटा गाड्या खरेदी केल्या असतांनाही मागील वर्षभरापासून नव्या घंटा गाड्या धूळखात ठेऊन घंटा गाडीच्या खासगी ठेकेदारांवर मनपा प्रशासन कोटींची उधळण होत आहे. तर या घंटागाड्यांवर चालक व इतर मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या घंटागाड्या जागीच उभ्या असल्याचा निर्वाळा भिवंडी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दोन महिन्यांपूर्वी दिला होता. मात्र आता एकही किलोमीटर न धावलेल्या या नव्या घंटा गाड्यांच्या निगा व दुरुस्थीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल एक कोटी सहा लाख वीस हजार रुपयांची निविदा काढली आहे. या निविदेला काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी आक्षेप घेतला असून ज्या नव्या गाड्या रस्त्यावर धावल्याच नाहीत त्यांच्यावर दुरुस्थीसाठी कोटींची उधळण कशाला असा सवाल देखील नगरसेवक राऊत यांनी उपस्थित केला आहे.
विशेष म्हणजे महापालिकेने ऑक्टोबर महिन्यात ५० नव्या घंटा गाड्या खरेदी केल्या असून त्यांच्या दुरुस्थीसाठीची निविदा सप्टेंबर महिन्यात काढण्यात आली आहे म्हणजे घंटा गाड्या खंगारदी करण्याच्या अगोदरच दुरुस्थीची निविदा काढण्यामागे व नव्या घंटा गाड्या इतक्या दिवस धूळ खात उभ्या ठेवण्यामागचे नेमकी गणित काय असा सवाल देखील काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी मनपा आयुक्तांनाकडे लेखी निवेदनाद्वारे विचारला आहे. काँग्रेस नगरसेवकांच्या या आक्षेपामुळे भिवंडी महापालिकेचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
दरम्यान ५० घंटा गाड्यांसाठी एकूण तीन निविदा मनपाने काढल्या असून एक निविदा वाहन चालक भर्तीसाठीची असून सदर विषय स्थायी समितीकडे प्रलंबित आहे, दुसरी निविदा या गद्यामध्ये लावण्यात येणाऱ्या जीपीआरएस सिस्टीम साठी आहे, तर तिसरी निविदा देखभाल दुरुस्तीसाठी असून या घंटा गाड्या जेव्हा रस्त्यावर धावणार, त्यावेळी जर त्यांना काही अपघात व दुरुस्तीचे करण्याची वेळ आली तर त्यासाठी पाच वर्षांसाठी ही निगा व देखभाल दुरुस्तीची निविदा काढली आहे. आता, उभ्या असलेल्या घंटागाड्यांच्या दुरुस्तीसाठी हि निविदा काढली नाही, अशी प्रतिक्रिया भिवंडी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी दिली आहे.