- अजित मांडके
ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकांना अद्याप दीड वर्षाचा अवधी शिल्लक आहे. परंतु, त्याआधीच रणनीती ठरवून भाजपला रोखण्याचे प्रयत्न आघाडीकडून केले जाणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे स्वबळावर निवडणूक लढणार आहेत. परंतु, २०१७ च्या महापालिकेच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून आले होते, त्या जागांवर राष्ट्रवादी लढणार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. त्यासाठी शिवसेना त्यांना आतून मदत करणार आहे. भाजपला रोखण्यासाठीच ही रणनीती तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठामपाच्या २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या गुप्त बैठकीत शिवसेना व राष्ट्रवादीने स्वबळावर लढून निवडणुकीनंतर सत्तेत एकत्रित सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आगामी निवडणुकीत भाजपचा एकही नगरसेवक निवडून न देण्याचा निर्धार करून काँग्रेसनेही बळाचा नारा दिला आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक विद्यमान नगरसेवक हे भाजपमध्ये दाखल झाले होते. परंतु, आता त्यांना पुन्हा स्वगृही आणण्याची तयारी सुरू आहे. जेथे भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, त्या जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करून शिवसेना त्यांना आतून सहकार्य करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बालेकिल्ला मिळविण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्नजुने ठाणे म्हणून ओळख असलेल्या नौपाडा आणि आजूबाजूच्या मध्यवर्ती भागातून शिवसेनेची मागील निवडणुकीत पीछेहाट झाली होती. आता पुन्हा वर्चस्व मिळविण्यासाठी शिवसेना या ठिकाणी राष्ट्रवादीचे सहकार्य घेऊन भाजपला या बालेकिल्ल्यातून हद्दपार करण्यासाठी सज्ज झाली आहे.
प्रथमच होणार शिवसेना विरुद्ध भाजप लढत मागील महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे स्वबळावर लढले होते. परंतु, त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. त्यानंतर, राज्यात महाविकास आघाडी सरकारचे बिगुल वाजले आणि महापालिकेतही राष्ट्रवादी विरोधी बाकावरून थेट महाविकास आघाडीच्या बाजूने झुकली. आता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत प्रथमच ठाण्यात बघावयास मिळणार आहे.