सदानंद नाईक
शहरात मोकाट कुत्र्याच्या दहशतीने नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर जाण्यास भीत असल्याचे चित्र असून कुत्रा चावल्याच्या घटनेत वाढ झाली. अखेर श्वानांची निर्बिजीकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून निविदाही काढल्या आहेत.
उल्हासनगरात सिंधी बांधव धार्मिकवृत्तीचे असल्याने मोकाट कुत्र्यांना व अन्य प्राण्यांना जेवण देत असतात. याचा परिणाम कुत्र्याच्या संख्येत वाढ झाली. असे बोलले जात आहे. श्वान चावल्याच्या घटनेत वाढ झाली असून मध्यवर्ती रुग्णालयात दरमहा ४०० पेक्षा जास्त श्वानने चावा घेतल्याची नोंद आहे. गेल्या आठवड्यात ९८ कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद असल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे उपजिल्हाचिकित्सक डॉ शशिकांत डोडे यांनी दिली. तर कुत्र्याच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी कुत्र्याचे निर्बिजीकरण करण्याचा निर्णय महापालिका आरोग्य विभागाने घेतला. त्यासाठी गेल्याच महिन्यात निविदा काढल्या असून श्वानांची शस्त्रक्रियासाठी महापालिका मुख्यालय मागील कोंडवाड्याच्या शेजारी बांधकाम बांधण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त डॉ सुभाष जाधव यांनी दिली. वर्षाला साडे चार हजार श्वानांची निर्बिजीकरण्याचे टार्गेट असून ही प्रक्रिया सुरूच राहण्याची शक्यता जाधव यांनी व्यक्त केली.
शहरात कुत्र्याच्या संख्येत वाढ झाल्याची ओरड गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. त्यानंतर यावर्षी श्वानाचे निर्बिजीकरण सुरू होणार आहे. एका श्वानांची निर्बिजीकरणावर ९३० रुपये खर्च येणार आहे. श्वान ज्या परिसरातून पकडून आणले, त्याच ठिकाणी त्यांना निर्बिजीकरण केल्यानंतर तीन दिवसांनी सोडून देण्यात येणार आहे. कुत्र्याच्या वाढत्या संख्येने शहरातील नागरिकांत भितीचे वातावरण आहे. रात्रीचे १० वाजल्यानंतर नागरिक कुत्र्याच्या भीतीने बाहेर पडत नसल्याचे चित्र शहरात आहे. महापालिकेने निर्बिजीकरण करण्याच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.