नितिन पंडीत
भिवंडीत सडक्या फळांचा रस विकणाऱ्या रस विक्रेत्याचा व्हिडीओ शनिवारी शहरात प्रचंड व्हायरल झाला असून भिवंडी अशाप्रकारे सडक्या फळांचा रस सर्रासपणे विकला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनासह भिवंडी महापालिका प्रशासनाचेदेखील शहरात रस्त्यावरील खाद्य विक्री करणाऱ्या हातगाडी चालकांवर दुर्लक्ष होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
भिवंडीतील साईबाबा मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या एक दुकानदार सडकी फळे आणून या सडक्या फळांचा रस ग्राहकांना पिण्यासाठी बनवत होता. एका दक्ष नागरिकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने सडक्या फळांचा रस बनविणाऱ्या व विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा व्हिडीओ काढून समाज माध्यमावर प्रसारित केला. त्यानंतर अवघ्या काही तासातच भिवंडी शहरात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे या रस विक्रेत्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शहरात अशा प्रकारे सडक्या फळांचा रस विकणारे तसेच निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकणारे हात गाडी चालक ठिक ठिकाणी व गल्लोगल्लीत पसरले असून त्यांच्याकडे मनपा प्रशासनातील संबंधित जबाबदार अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे.