लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली: आपापसातले हेवेदावे कमी करून काँग्रेस पक्षाला बळकटी मिळवून देण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र यावे, आणि पुन्हा आपण सत्तेत जाण्यासाठी सगळ्यांनी मनलावून काम करावे, असे आवाहन पक्षाचे सचिव बी. एम. संदीप यांनी डोंबिवलीत केले.
पक्षाच्या शक्ती अॅपची माहिती कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांना देण्यात यावी यासाठी येथील सर्वेश सभागृहामध्ये शनिवारी पक्षातर्फे निरिक्षकांसमवेत शक्ती अॅप संदर्भात माहिती व मार्गदर्शन मेळावा तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सचिव संदीप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी, आणि भाजपा सरकार हे भ्रष्टाचारी असून त्यांनी चार वर्षांत विशेष काहीही केलेले नाही. आधारकार्ड असो की, अन्य योजना या सगळया कॉंग्रेस सरकारच्या काळातीलच आहेत. यांनी मल्ल्या, निरव मोदी यांसह अनेक जणांना मोठे केले. राफेल घोटाळा हा देखिल त्याचेच एक उदाहरण असून नागरिकांनी सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केले. पण असे करत असतांना पक्षांतर्गत गटबाजी, दुफळी, हेवेदावे असता कामा नये. कार्यकर्त्यांनी, पदाधिका-यांनी एकत्रितपणे काम करणे खूप गरजेचे आहे. आता काही काळात निवडणूका जाहीर होतील. त्यावेळी एक दिलाने काम करून पुन्हा सत्तेत जाण्यासाठी सगळयांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. सगळयांनी याचा निश्चित विचार करा, सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कामाला लागा असेही त्यांनी सांगितले. यावेळी पक्ष निरिक्षक राजेश शर्मा, राजन भोसले आदींनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. डोंबिवलीमध्ये झालेल्या या पक्ष उपक्रमात चांगल्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आल्याचे बघून आनंद झाला. त्यामुळे अजूनही पक्षाला सहज बळकटी मिळू शकते, कार्यकर्त्यांनी एकजूटीने कार्यरत व्हावे असे ते म्हणाले.
याच बैठकीच्या निमित्ताने पक्षाच्या शक्ती अॅप संदर्भात कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली. त्याद्वारे कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचावे. आणि त्यांना पक्षाने देशाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती द्यावी. त्यांना काँग्रेसला मतदान का द्यावे, याचेही आवाहन करावे असे सांगण्यात आले. शक्ती अॅपच्या माध्यमातून नागरिकांना थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमवेत बोलण्याची संधी मिळणार आहे. गांधी हे नागरिकांशी बोलतील, त्यांच्या समस्या, अपेक्षा जाणून घेतील. आणि ते बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतील. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सर्वसामान्यांसह पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शक्ती अॅप डाऊनलोड करून घ्यावे, असेही सांगण्यात आले.
यावेळी पक्षाचे येथील महापालिकेचे गटनेते नंदू म्हात्रे, पप्पू भोईर, नगरसेविका हर्षदा भोईर, माजी नगरसेवक नविन सिंग, सचिन पोटे, नेते संतोष केणे, रवी पाटील, अमित म्हात्रे, कांचन कुलकर्णी, राहुल काटकर, गंगाराम शेलार, एकनाथ म्हात्रे, शारदा पाटील, वर्षा गुजर, दिप्ती जोशी, वर्षा शिखरे, मीना सिंग, सदाशिव शेलार, नगरसेविका दर्शना शेलार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.