ठाणे : हल्ली प्रत्येक गोष्टीत ताण वाढत आहे. ताणतणावाची अनेक कारणे आहेत. कुटुंबातील हरवत चाललेला संवाद हे ही तणावाचे मुख्य कारण आहे. दोन पिढ्यांनी एकमेकांशी संवाद साधला तर बराचसा ताण कमी होईल असे मत समुपदेशक अश्विनी बनसोडे यांनी व्यक्त केले.अत्रे कट्ट्यावर बुधवारी मानसीक तणावांची कारणे व उपाय या विषयावर बनसोडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी त्या म्हणाल्या की, कोणतीही वेळ नाही जिथे तणाव नाही, तणावाला सगळेच जण सामोरे जात असतात. तणाव हा मानसीक नसतो तर शारिरीकही असतो. या तणावात सकारात्मक आणि नकारात्मक ताण असतात. ताण घेताना त्यात दृष्टीकोन महत्त्वाचा असतो. तणाव कमी करण्यासाठी नियोजन महत्त्वाचे असते. वेळेचे नियोजन न केल्यास तणाव वाढत जातो हे सांगताना त्यांनी उदाहरणे दिली. तरुणांमध्ये वाढत चाललेल्या तणावाचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या वाढत चाललेल्या गरजा आणि इच्छा तर कुटुंबातील दबावामुळे ज्येष्ठ नागरिकांत तणाव वाढत आहे. कुटुंबातील संवाद हरविल्यामुळे ज्येष्ठांमध्ये दुर्लक्ष होण्याचा विचार येतो. ज्येष्ठांना या वयात येणाऱ्या रिकामपणामुळे त्यांच्यातील तणाव वाढत आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे दबाव यत आहे. तो दबाव बाहेर काढायला कोणी येत नाही याचे कारण कुटुंबात संवाद नाही. दबाव हा एकमेकांशी बोलून कमी होतो. पालकांच्या मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत हा ही पालकांवरचा ताण आहे. त्यामुळे पालकत्व सेमीनार घेण्याची गरज आहे. कौशल्याने तणावाचे व्यवस्थापन केल्यास तो कमी होतो हे सांगताना त्यांनी तणावाची लक्षणे स्पष्ट केली. शेवटी त्यांनी तणाव कमी करण्याचे उपायही सांगितले. त्या म्हणाल्या की, तुमच्या आवडीचा छंद जोपासा, आहे ती परिस्थीती स्वीकारा, नाही म्हणायला शिका, मनाला आनंद देणारे संगीत ऐका, कामाचे व वेळेचे नियोजन करा, मित्र मैत्रिणीबरोबर विनोदी चित्रपट पाहा, मेंदूला शांतता देणारे सुगंधी अत्तर वापरा. यावेळी ज्येष्ठांनी त्यांच्याशी संवाद साधला. सुरूवातीला राधा कर्णिक यांनी परिचय करुन दिला.
कुटुंबातील हरवलेल्या संवादामुळे तणाव वाढतोय : अश्वीनी बनसोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 4:43 PM
आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे अश्विनी बनसोडे यांनी मानसीक तणावांची कारणे व उपाय या विषयावर मार्गदर्शन केले.
ठळक मुद्देदोन पिढ्यांनी एकमेकांशी संवाद साधला तर बराचसा ताण कमी होईल - अश्वीनी बनसोडेमानसीक तणावांची कारणे व उपाय या विषयावर मार्गदर्शन तुमच्या आवडीचा छंद जोपासा - अश्वीनी बनसोडे