कल्याण : येथील पश्चिमेकडील काळी मशीद परिसरात असलेला आणि रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारा जुना दर्गा हटवण्यावरून शनिवारी विरोध झाला. तर, दुसरीकडे तत्पूर्वी येथील सार्वजनिक स्वच्छतागृह तोडण्यावरून नागरिकांनी संताप व्यक्त केला. पर्यायी व्यवस्था न करताच स्वच्छतागृह तोडल्याचा आरोप केला असून सोमवारी या कारवाईच्या निषेधार्थ केडीएमसी मुख्यालयावर टमरेल मोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील रस्ते विकासाआड येणाऱ्या बांधकामांवर महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. त्यात धार्मिक स्थळांवरही हातोडा टाकला. या कारवाईअंतर्गत शनिवारी येथील जुन्या दर्ग्यावर कारवाई केली. दरम्यान, तत्पूर्वी याच परिसरातील स्वच्छतागृह महापालिकेकडून शुक्रवारी रात्री उशिरा पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. कारवाईच्या वेळी मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता. संतप्त झालेल्या स्थानिक नागरिकांनी प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांची गाडी तासभर रोखून धरली. या वेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी नागरिकांना बाजूला केल्यानंतर महापालिकेने कारवाई केली. २० वर्षांपासून अस्तित्वात असलेले चार सीटचे हे स्वच्छतागृह तोडल्याने नागरिकांची गैरसोय होणार असल्याचे नगरसेवक श्रेयस समेळ यांचे म्हणणे आहे. दर्ग्याला पर्यायी जागा देण्यासाठी हे स्वच्छतागृह तोडले असले, तरी हे स्वच्छतागृह रस्त्याच्या कामात अडथळा ठरत नव्हते. तसेच ते तोडण्यापूर्वी महापालिकेने पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु, तसे झाले नाही, याकडे समेळ यांनी लक्ष वेधले. वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित ठिकाणी अन्य एक स्वच्छतागृह असून नागरिकांसाठी फिरते स्वच्छतागृहही देण्यात आल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)कायमस्वरूपी सुविधा हवी : फिरते स्वच्छतागृह कायमस्वरूपी सुविधा नाही. त्यांची स्वच्छताही होत नाही. त्यामुळे नागरिक तेथे जाण्यास टाळाटाळ करतात. तसेच याच्या शिड्यादेखील गायब झालेल्या असतात. परिणामी वृद्ध, अपंग व्यक्त ींना त्रासाला सामोरे जावे लागते अशा विविध कारणांमुळे कायमस्वरूपी सुविधा हवी. तात्पुरती नको. रस्ते विकासाच्या कामाला तसेच स्वच्छतागृह तोडण्याला माझा विरोध नव्हता. परंतु, पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच कारवाई करा, अशी माझी मागणी होती, असे स्थानिक नगरसेवक समेळ यांनी सांगितले.महासभेत घेतले होते तोंडसुख : स्वच्छतागृहाचा मुद्दा मागील महासभेतही चांगलाच गाजला होता. स्वच्छतागृह तोडण्यासाठी प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती. या संदर्भात पर्यायी सुविधा देण्याबाबत प्रशासनाकडे मागणी केली असता तुम्ही, तुमची सोय करा असे सुनावण्यात आले होते. यावरून स्थानिक नगरसेवक श्रेयस समेळ यांनी अधिकाऱ्यांवरती तोंडसुख घेतले होते.
स्वच्छतागृह तोडण्यावरून कल्याणमध्ये तणाव
By admin | Published: April 10, 2017 5:28 AM