ठाणे : समृद्धी महामार्गांवर झालेल्या अपघाताची घटना अत्यंत दुर्देवी आहे. याबाबत चाैकशी करण्याचे आदेश आपण दिले आहेत. त्यात दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली. ठाण्याच्या प्रसिद्ध टेंभी नाक्यावरील देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री शिंदे रविवारी सकाळी सहभागी झाले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येईल. जखमींचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाईल, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
समृद्धी महामार्गांवर रविवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास जांबरगाव टोलनाक्यासमोर टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात बसमधील १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृत पावलेले सर्वजण नाशिक शहरातील रहिवासी होते. टेम्पो ट्रॅव्हलरमधील सर्व प्रवासी सैलानी बाबाच्या दर्शनासाठी गेले होते. शनिवारी ते पुन्हा नाशिकला परतत होते. वाटेत वैजापूर तालुक्यातील जांबरगावजवळ उभ्या ट्रकला भरधाव वेगातील टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिली. या संदभार्त रविवारी ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली. त्यावेळी ते म्हणाले की हा अपघात अत्यंत दुर्देवी आहे. यासंपूर्ण घटनेची चोकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
प्राथमिक पाहणीत आरटीओच्या अधिकाऱ्यांनी महामार्गांवर एक ट्रक थांबवला. त्यानंतर त्याला बस धडकून हा अपघात झाला आहे. परिणामी या घटनेला जे जवाबदार असतील त्या अधिकारी किंवा ट्रकचा चालक यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर सबंधित व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याबाबतही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सर्व दोषींवर यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. त्याचबरोबर समृद्धी महामार्गांवर आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता लवकरच करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत करण्यात येईल. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींचा संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या माध्यमातून केला जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. ही घटना घडल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे त्वरित घटनास्थळी पोहचले होते . अशी माहिती ही मुख्यमंत्र्यांनी दिली. या अपघाताचे ज्यांना राजकारण करणाऱ्यांना ते करू दया, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.