बदलापूर : राज्य सरकारने लागू केलेला लॉकडाऊन आणखी कडक करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर बदलापूर पालिकेने घेतला आहे. आमदारांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेडिकल स्टोअर आणि रुग्णालय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवाही आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एकीकडे राज्य सरकार नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, त्या अनुषंगाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत नवनवीन प्रयोग करीत आहे. तर दुसरीकडे बदलापुरातून कोरोना हद्दपार करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासनाचे शहरात कडक लॉकडाऊन जाहीर करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत. येत्या शनिवारपासून पुढील सात दिवस शहरात कडक लॉकडाऊन जाहीर करीत नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. या काळात मेडिकल स्टोअर आणि दवाखाने वगळता सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही परवानगी नसताना पालिका प्रशासनाने हा ठोस निर्णय घेण्याचे धाडस केले आहे. मात्र, पालिकेच्या या निर्णयाला जिल्हाधिकारी मान्यता देतात की नाही, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
-------------------------------------
साखळी तोडण्यास होईल मदत
शहर पातळीवर लॉकडाऊन जाहीर करणे, ही काळाची गरज असल्याचे मत आ. किसन कथोरे यांनी व्यक्त केले आहे. एक आठवडा सर्व नागरिकांनी घरी बसून कोरोनाशी लढा दिल्यास कोरोनाची साखळी तोडण्यात यश मिळेल, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला. शहर पातळीवर पोलिसांच्या मदतीने कडक लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी व्यक्त केले.