उल्हासनगर : वीकेंडच्या दुसऱ्या दिवसाच्या लॉकडाऊनला शहरात कडकडीत बंद असून पोलिसांनी कामाविना फिरणाऱ्या नागरिक व वाहनचालकांची चांगलीच हजेरी घेतली. सोमवारी व्यापारी लॉकडाऊनबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शहरातील शहाड फाटक परिसर, बिर्ला गेट चौक, शहाड, उल्हासनगर व विठ्ठलवाडी पोलीस ठाणे रेल्वे स्टेशन, गोल मैदान, शिवाजी चौक, १७ सेक्शन चौक, श्रीराम व पवई चौक, नेहरू चौक, व्हीनस चौक, भाटिया चौक, नेताजी चौकसह मुख्य बाजारपेठेत सर्वत्र शुकशुकाट होता. पोलीस प्रत्येक चौकात भरउन्हात लक्ष ठेवून होते. त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे महापालिका अधिकारी, कर्मचारी कुठेच दिसले नाहीत. नागरिकांसह व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला सहकार्य केले असून राज्य सरकारने सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ‘अत्यावश्यक सेवे’च्या दुकानांसह अन्य दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.