ठाणे : वीकेंड लॉकडॉऊनच्या निमित्ताने शनिवारी ठाणे शहरात कडकडीत बंद पाळला गेला. मेडिकल वगळता इतर सर्व सेवा बंद होत्या. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची पोलिसांकडून चांगलीच कानउघाडणी केली जात होती. विनाकारण फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्तीची कारवाईदेखील पोलिसांनी केली. तर अत्यावश्यक सेवा वगळता म्हणजेच, मेडिकल दुकाने वगळता इतर सर्वच व्यवहार बंद होते. स्टेशन व जांभळीनाका परिसर येथील मुख्य बाजारपेठेतदेखील शुकशुकाट होता.
कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीने वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारी ठाण्यातही कडक लॉकडाऊन पाळण्यात आला. ठाण्यातील सर्वात गर्दीचे ठिकाण म्हणजे, जांभळीनाका येथील मार्केट परिसरात पूर्णपणे शुकशुकाट होता. येथील मेडिकल सेवा वगळता इतर दुकाने, भाजीमार्केट, किराणा मालाची दुकानेदेखील बंद होती. तसेच येथील सर्व मार्केट परिसर बंद ठेवले होते. स्टेशन रोड परिसरात असलेले सर्व दुकाने बंद होती. मुख्य भाजीमंडई बंद होती. तर धान्य मार्केटदेखील बंद होते. पोलिसांनी बॅरीकेडस लावून रस्ते बंद केले होते. स्टेशन परिसर, टॉवरनाका, कोर्टनाका, महागिरी, खारकर आळी, कडकडीत बंद होता. याठिकाणी पोलिसांचा वॉच होता. पोलिसांच्या तीन टीम तीन पॉईंटवर ठेवल्या होत्या. जांभळीनाका, कोर्टनाका, खारकर आळीला प्रत्येकी १५ पोलिसांची टीम तैनात होती.
ठाण्यातील रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळला. रस्त्यावरील वाहनांची वर्दळही कमी असल्याचे दिसून आले. ठाणेकरांनी वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसत होते. तलावपाळी, चिंतामणी चौक सारखा परिसर शांत होता. पोलिसांनी नाकाबंदी केली होती, रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी केली जात होती. अपवाद वगळता ठाणेकरांनी वीकेंड लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला. त्यातही पोलीस पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आलेले दिसून आले. कापूरबावडीसारख्या जंक्शनवर पोलिसांनी नाकाबंदी केलेली होती. भिवंडी आणि घोडबंदर रोडवरून येणाऱ्या वाहनचालकांची चौकशी पोलीस करत होते. अत्यावश्यक सेवेत असलेल्यांना पुढे ठाण्यात पाठविले जात होते. तर विनाकारण बाहेर पडलेल्यांना पुन्हा घरी पाठविले जात होते.