अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : गेल्या महिन्यात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी आश्वासन मिळाले होते. पण, ते आश्वासन अद्यापही पूर्ण न झाल्याने शुक्रवारी सकाळी अचानक ठाणे महापालिका परिवहन सेवेतील कंत्राटी वाहकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.
महागाईच्या काळात ठोक मानधन मिळावा, अशी त्या कंत्राटी वाहकांची प्रमुख मागणी असून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा आंदोलन कर्त्या वाहकांनी दिला आहे. प्रवाशांना वेठीस धरायचं नाही, पण आमच्या मागण्या मान्य झाल्यावर तातडीने कामावर हजर होऊ असेही त्या वाहकांचे म्हणणे आहे. घोडबंदर रोडवरील आनंदनगर आगार येथे पुकारलेल्या आंदोलनात २३५ पुरुष तर १२५ महिला वाहकांनी सहभाग घेतला आहे.
शुक्रवारी सकाळी तीन वाजल्यापासून ठाणे परिवहन सेवेतील कंत्राटी वाहकांनी काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे परिवहन बस सेवेवर मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झाला आहे. रोख पगार मिळावा त्याचप्रमाणे इतर मागण्या मान्य व्हाव्या यासाठी अनेक वर्षांचा पाठपुरावा करून देखील आम्हाला तो पगार थेट मिळत नसल्याने आम्ही हे आंदोलन करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. वाहक बस कर्मचाऱ्यांना ठोक मानधन मिळावं यासाठी कर्मचारी आज आंदोलनाला बसणार आहेत.
अनेक मुलींच्या गरजा आहेत महिन्याच्या महिन्याला पगार मिळावा आणि महापालिकेने ठरवलेला पगार २१ हजार तोच देण्यात यावा, अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे. जे आमच्या पगारामधील पैसे कापले जात आहेत त्या पैशांचा आपला अजिबात उपयोग होत नाही असे ही त्यांचे म्हणणं आहे. जेव्हा माणूस आजारी होईल तेव्हाच त्याला त्याचा उपयोग होतो. आमच्या पगारामधून जी जीएसटी कट होत आहे, त्याचा आम्हाला फायदा होत नाही. घरकाम करून पण जर त्याचा पगार २२ हजार १५ हजार असा असेल तर आमच्या साठी ती लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही सरकारी नोकरी करूनही आमच्या हातात येणार पगार हा ९ हजार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. याबाबत परिवहन सभापती विलास जोशी यांच्याकडे तोडगा काढण्याचे काम सुरू आहे.