भिवंडी - विद्युत अपघातात जखमी झालेला वीज कर्मचारी नरेश गोवारी याच्या न्याय्य हक्कासाठी श्रमजीवी संघटनेने गणेशपुरी येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. नरेशला श्रमजीवीच्या या आंदोलनाने न्याय मिळाला आहे. त्याचा उपचाराचा संपूर्ण खर्च, तातडीची भरपाई, उपचारकाळात वेतन, संबंधितांवर कायदेशीर कारवाई आणि नरेश याच्या पत्नीला कामावर घेण्याची केलेली मागणी यावेळी वीज वितरण अधिकाऱ्यांनी मान्य केली.
वीज वितरणच्या गणेशपुरी विभागात नरेश हा वीज कर्मचारी कार्यरत आहे. २१ मे रोजीच्या वादळी पावसामुळे वीज वितरणची संपूर्ण व्यवस्था कोलमडलेली होती. अशावेळी नरेशने स्वतःचा जीव धोक्यात टाकून वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी आपल्या वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे काम केले. यादरम्यान एका इसमाने अचानक वीज कनेक्शन सुरू केल्याने नरेशला विजेचा धक्का लागला आणि तो खांबावरून कोसळला व गंभीर जखमी झाला. त्या काळात जी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे क्रमप्राप्त होते ती गणेशपुरी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली नाही. हे प्रकरण संघटनेकडे येताच रीतसर पत्रव्यवहार करून शिष्टमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते विद्युत अधिकाऱ्यांसोबत चर्चेला गेले. तेव्हाही विद्युत अधिकाऱ्यांनी सकारात्मक चर्चा न करता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे श्रमजीवीने शुक्रवारी मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाची दखल घेत वीज वितरणचे अधिकारी प्रशांत सोनार, संजय तिडके, इरफान शेख यांनी स्वतः गणेशपुरी येथे येऊन मोर्चेकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी श्रमजीवीचे खजिनदार फ्रान्सिस लेमोस, प्रवक्ते, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार, तालुका अध्यक्ष सुनील लोने, उपाध्यक्ष नारायण जोशी व इतर उपस्थित होते.