ठाणे : ग्लोबल कोविड सेंटरमधील डॉक्टर, नर्सेससह इतर कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याच्या निषेधार्थ बुधवारी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. कर्मचाऱ्यांशी चर्चा न करता अचानक कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा दिल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ग्लोबल रुग्णालयात डॉक्टर्स आणि नर्सेसची भेट घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. पालिका प्रशासनाने याप्रकरणी तीन दिवसांचा वेळ मागितला असून त्यानंतर यावर निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
ठाणे महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स आणि नर्स यांची भरती करण्यात आली होती. आता दुसरी लाट ओसरू लागल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या नोटिसा संबंधित कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. यापूर्वीदेखील अशाच प्रकारे नोटीस न देता या सर्व कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले होते. त्यावेळी देखील अशाच प्रकारे कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन करण्यात आले होते. यावेळीही संबंधित ठेकेदाराने सर्व कर्मचाऱ्यांना कमी केल्याने बुधवारी सकाळपासूनच काम बंद आंदोलन छेडण्यात आले होते.
बेमुदत रुग्णालय बंद करू - प्रवीण दरेकर
कोरोना काळात सर्व कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. आता गरज संपली तर अशा प्रकारे त्यांना काढून टाकणे योग्य नसल्याचे दरेकर यांनी सांगितले. जोपर्यंत कंत्राट सुरु आहे तोपर्यंत कर्मचाऱ्यांना काढण्यात येऊ नये, तसेच संबंधित एजन्सी बदलण्याचीही मागणी त्यांनी यावेळी केली. यासंदर्भात त्यांनी आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याशी चर्चा केली असून तीन दिवसांत यावर निर्णय न झाल्यास बेमुदत संप करून रुग्णालय बंद करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
प्रशासनाने मागितली तीन दिवसांची मुदत
ग्लोबल हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांसंदर्भात दरेकर यांच्या प्रामुख्याने तीन मागण्या आहेत. जोपर्यंत कंत्राट आहे तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येऊ नये, मनमानी पद्धतीने पगार कमी करण्यात येऊ नये, तसेच या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करून घेणे या त्या मागण्या आहेत. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा झाली असून, आयुक्तांशीही चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी तीन दिवसांची मुदत मागितल्याची माहिती यावेळी ग्लोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली आहे.