ठामपात ‘एक’मताने महिलाराज ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत पुरु ष मतदारांची संख्या जास्त असली तरी निवडून येणाऱ्यांमध्ये मात्र महिलाच बाजी मारणार आहेत. पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने होत असलेल्या निवडणूक रचनेत एका महिलेला जास्त जागा मिळाली आहे. त्यामुळे महासभेत ६५ नगरसेवक, तर ६६ नगरसेविका असणार आहेत.ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम मतदारयादी २४ जानेवारीला प्रसिद्ध झाली. यामध्ये पुरुष मतदारांचे प्रमाण हे स्त्री मतदारांपेक्षा एक लाखाने अधिक आहे. असे असले तरी महापालिकेत मात्र एक नगरसेविका जास्तीची निवडून जाणार असल्याने महापालिकेत ‘महिलाराज’ येणार, हे निश्चित मानले जात आहे. ठाणे महापालिकेची यंदाची निवडणूक ही बहुसदस्यीय पॅनलची असल्याने येथून ३३ प्रभागांतून १३१ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. यामध्ये ६५ पुरुष आणि ६६ महिलांचा समावेश आहे. यंदाच्या निवडणुकीत १२ लाख ३० हजार २६३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरु ष मतदार ६ लाख ६८ हजार ८१६, तर स्त्री मतदारांची संख्या ५ लाख ६१ हजार १७८ एवढी आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत केवळ ३५ हजार ४२७ मतदारांची वाढ झालेली आहे. २०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत द्विसदस्यीय पॅनल होते. त्या वेळेस ६५ नगरसेवक आणि ६५ नगरसेविका महापालिकेवर निवडून गेल्या होत्या. परंतु, यंदा हा रेशो एक टक्क्याने वाढला असून प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर आणि आरक्षण सोडत निघाल्यावर एक जागा ही महिलेची वाढलेली आहे. आता पालिकेवरील पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढून महिलांचे बहुमत प्रस्थापित होणार आहे. असे जरी असले तरी पुरुष या महिलांना विविध प्रकारच्या विषय समित्या, स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण मंडळ आदींसह इतर समित्यांमध्ये कितपत स्थान देणार, ते येणारा काळच ठरवणार आहे. (प्रतिनिधी)
ठामपात ‘एक’मताने महिलाराज
By admin | Published: January 27, 2017 10:06 PM