अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : सध्या गणेशोत्सवात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्लास्टिक बंदी संकल्पनेला हरताळ फसला गेला आहे. दीड दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी निर्माल्यात मागील वर्षापेक्षा जास्त प्लास्टिक आढळून आले आहे. त्यामुळे निर्माल्य संकलन करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी डोंबिवली पश्चिमेतील कोपर, गणेशघाट, जुनी डोंबिवली, रेतिबंदर, सातपूल जेट्टी, कुंभारखान पाडा, ठाकुर्लीतील चोळेगाव तलाव, एमआयडीसीतील मिलापनगर तलाव, नेहरुनगर या विसर्जनस्थळांवर सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक निर्माल्य संकलनाचे काम करत आहेत. मागील वर्षी महापालिका हद्दीत २४ ठिकाणी सामाजिक, पर्यावरणीय संस्थेचे कार्यकर्ते कार्यरत होते. यंदा दीड दिवसांच्या विसर्जनावेळी वरील नऊ ठिकाणी सुमारे १०० स्वयंसेवकांनी निर्माल्य संकलित केले. त्यात प्लास्टिकचे प्रमाण सर्वाधिक होते.
उत्सवकाळातील प्रदूषण टाळण्यासाठी नियमांचे पालन केले पाहिजे. अन्यथा पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होईल. त्याच्या दुष्परिणामांना आपल्याला सगळ्यांना सामोरे जावे लागेल असा, धोक्याचा इशाराही पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला. गेल्यावर्षी सुमारे ५० टन निर्माल्य जमा झाले होते, त्यात जेवढे प्लास्टिक नव्हते, त्यापेक्षा जास्त प्लास्टिक पहिल्या दीड दिवसांत जमा झाल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.
केडीएमसीने शून्य कचरा मोहीम राबविताना प्लास्टिक टाळून कापडी पिशव्या वापरण्याबाबत जागृती केली होती. त्यामुळे नागरिकही स्वतःहून कागदी, कापडी घेऊनच बाजारात जात होते. शिवाय दुकानदारही त्या पिशव्या देत होते. कचराही कागदात गोळा करायला लागले होते पण अल्पावधीत त्यांनी पुन्हा प्लास्टिकचा वापर सुरू केला आहे. फेरीवालेही प्लास्टिकच्या पिशव्यांतून भाजीपाला, फळे व अन्य साहित्य देत असल्याचे दिसून येत आहे.
--------------
दीड दिवसांच्या विसर्जनावेळी निर्माल्य संकलनात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक जमा झाले. मागीलवर्षी अनंत चतुर्दशीला जेवढे जमा झाले होते तेवढे आताच दीड दिवसांच्या विसर्जनाच्या दिवशी गोळा झाले आहे. त्यामुळे निर्माल्य किती टन संकलन झाले, यापेक्षा प्लास्टिक वाढले हे गंभीर आहे.
- रुपाली शाईवाले, पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली
----------
नागरिक सुधारणार कधी?
प्रत्येक गोष्ट प्लस्टिकमध्ये गुंडाळून टाकली जात आहे. गणेशोत्सवात दीड, दोन दिवसांत सुमारे १० टन निर्माल्य संकलित झाले आहे. त्यात प्लास्टिकचे प्रमाण खूप आहे. नागरिकांनी स्वत:ला शिस्त लावली तरच पर्यावरण राखले जाईल. सिंधुदुर्ग, कर्जत, माथेरानमध्ये नागरिकांनी स्वतःहून सुधारणा केलीच की? केडीएमसी हद्दीत मात्र नागरिकांना समजावून सांगताना खूप अडथळे येत आहेत. प्लास्टिक सोडून कागद वापरण्याची सवय लावायला हवी.
- रामदास कोकरे, उपयुक्त, घनकचरा विभाग, केडीएमसी
-----------------
------------