लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे परिवहन सेवे मधील धर्मवीर आनंद दिघे आगारात कार्यरत असलेले कंत्राटी पुरुष व महिला वाहक २१ ऑगस्टपासून विविध मागण्यासाठी बेमुदत संपावर जाणार होते. मात्र परिवहन समिती सभापती आणि परिवहन व्यवस्थापक यांनी शनिवारी सायंकाळी उशिरा या कर्मचाऱ्यांशी बोलणी करून त्यांच्या मागण्याबाबत ठाणे महापालिका आयुक्ताशी चर्चा करून सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हा नियोजित संप स्थगित करण्यात आला असल्याचे कर्मचाऱ्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
ठाणे परिवहन सेवेत कंत्राटी पध्दतीवर धर्मवीर आनंद दिघे, आगारात काम करणाऱ्या पुरुष व महिला वाहकांनी आपल्या विविध मागण्या संदर्भात सोमवार २१ ऑगस्ट रोजी संप पुकारला संप होता. या संपाने मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र यावर त्वरित तोडगा काढावा याकरिता परिवहन सेवा, समिती सभापती विलास जोशी आणि परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे आणि अधिकारी यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार शनिवारी १९ ऑगस्टला कंत्राटी वाहक प्रतिनिधी यांच्यात आनंदनगर डेपो येथे योग्य ती सफल चर्चा करण्यात आली.
यावेळी परिवहन व्यवस्थापक बेहेरे यांनी या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे तसेच याबाबत महापालिका आयुक्ता बरोबर चर्चेचे ठोस आश्वासन दिले. तर परिवहन समिती सभापती विलास जोशी यांनी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत चर्चा करण्यासाठी बेठकीची वेळ मागितली. त्यानुसार लवकरच याबाबत वेळ देण्याचे आश्वासन आयुक्त बांगर यांनी सभापती विलास जोशी यांना दिले. त्यानंतर याबाबतची माहिती. सबंधित सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी त्यांचा २१ ऑगस्टचानियोजित संप स्थगीत करण्याचा निर्णय घेतला.