ठाणे : झोपमोड झाल्याचा राग मनात धरून ठाण्यातील गौतम विद्यालयातील ५०-६० विद्यार्थ्यांना त्या शाळेच्या विश्वस्त शिल्पा गौतम यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी बुधवारी केला. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आलेल्या विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थ्यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले होते. या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाण्याच्या बाजारपेठ परिसरात इंग्रजी माध्यमाचे गौतम विद्यालय आहे. ज्युनिअर केजीपासून ज्युनिअर महाविद्यालयापर्यंतचे वर्ग येथे भरतात. विद्यालय सुमारे ५० वर्षे जुने आहे. विद्यालयातील ५वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांचा लवकरच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी बुधवारी दुपारी विद्यालयात विद्यार्थी डान्सची तयारी करताना वर्गातील बेंच हलवताना मोठ्याने आवाज होत होता. याचदरम्यान, त्या विद्यालयाच्या पहिल्या मजल्यावर विश्वस्त गौतम दाम्पत्य राहते. आजारी असलेल्या शिल्पा गौतम या दुपारी झोपल्या असताना या आवाजाने त्यांची झोपमोड झाली. याचा राग आल्याने त्यांनी ५ ते १० विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मदतीने त्यांच्या रूममध्ये बोलवून घेतले. त्यानंतर, विद्यार्थ्यांना एका रूममध्ये नेले. रूमला लॉक लावून फायबर रॉडच्या साहाय्याने त्यांनी विद्यार्थ्यांच्या हातापायावर, पाठीवर आणि डोक्यावर मारहाण केल्याची माहिती त्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी दिली.मारहाण झालेल्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी गुरुवारी शाळेच्या आवारात एकत्र येऊन ठाणेनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. त्यानुसार, पोलिसांनी मारहाण झालेल्या तब्बल १८ विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी रुग्णालयात त्यांचे एक्स-रे काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.दरम्यान, काँगे्रस प्रणीत नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया यांनी मारहाण करणाºया विश्वस्तांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.गौतम विद्यालयाचे काही विद्यार्थी पालकांसोबत पोलीस ठाण्यात आले. त्या वेळी त्यांनी विद्यालयाच्या विश्वस्तांनी मारहाण केल्याची तक्रार केली. त्यानुसार मारहाण झालेल्या १८ विद्यार्थ्यांना तातडीने सिव्हिल रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले. त्याचा अहवाल आल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- एम.व्ही. धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणेनगर पोलीस ठाणेविद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे. विश्वस्तांनी झालेल्या प्रकाराबाबत विद्यार्थी आणि पालकांची माफी मागितली आहे.- ज्योती नायडू, मुख्याध्यापक,गौतम विद्यालयगौतम विद्यालयातील मारहाणआणि विश्वस्तांच्या गैरवर्तणुकीबाबत काँग्रेसनेही निषेध नोंदवला आहे. मारहाण करणाºया विश्वस्तांवर कडक कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे पोलिसांकडे केली आहे.- अक्षय काळू, सरचिटणीस,नॅशनल स्टुडंट युनियन आॅफ इंडिया
झोपमोड केल्यामुळे मारहाण; ठाण्यातील घटना, ६० पैकी १८ विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, पालकांची पोलिसांत धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 2:00 AM