बदलापूर : स्टेशन परिसरात वाहतूककोंडीला जबाबदार असलेल्या फेरीवाल्यांवर आणि बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याचे संकेत नगराध्यक्ष अॅड. प्रियेश जाधव यांनी दिले आहेत. फेरीवाला आणि पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी बोलावलेल्या बैठकीत जाधव यांनी कारवाईचे संकेत दिले. तसेच कारवाईला अडथळा येऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बदलापूरमध्ये रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूंना गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या कोंडीवर तोडगा काढण्यासाठी बदलापूर पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष अॅड. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस, वाहतूक पोलीस, पालिका प्रशासन, फेरीवाले, रिक्षा संघटना आणि लोकप्रतिनिधींची एकत्र बैठक घेण्यात आली. बदलापूर रेल्वेस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून होम प्लॅटफॉर्मच्या कामासाठी रेल्वेतर्फे जागा अधिग्रहण करण्यात आली. त्या जागेवर रिक्षाथांबे, व्हॅन, फेरीवाल्यांचे बस्तान होते. होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू होण्यापूर्वी आमदार किसन कथोरे, शहरप्रमुख वामन म्हात्रे, मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण, नगराध्यक्ष जाधव, भाजप गटनेते राजेंद्र घोरपडे, मुख्याधिकारी प्रकाश बोरसे आदींनी रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन वाहतूककोंडी टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत काही रिक्षाथांबे पुढील जागा निश्चित होईपर्यंत रस्त्याच्या कडेला एकेरी रांगेत थांबतील, असे ठरले होते. तसेच बेकायदा पार्किंग, फेरीवाल्यांवर कारवाई करत रस्ता मोकळा ठेवला जाईल, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले होते.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून होम प्लॅटफॉर्मचे काम सुरू झाल्यानंतर रिक्षाथांबे रस्त्यावर आले आहेत. तर, व्हॅन रस्त्याच्या दुसºया बाजूला उभ्या केल्या जातात. त्यातच बेकायदा फेरीवाल्यांचे प्रमाणही वाढत होते. त्यामुळे बदलापूर स्थानकाबाहेरच्या या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर मोठी अवजड वाहने, राज्य परिवहन आणि भाजीपाल्याचे ट्रक आल्यास वाहतूककोंडी होते. तर, रिक्षाचालकांकडून दुहेरी रांग लावली जात असल्याने पादचाऱ्यांना चालणे तर वाहनचालकांना स्थानक परिसरातून वाहन घेऊन जाणे अशक्य होते.गेल्या काही दिवसांपासून या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे ही बैठक झाली. या बैठकीत जुन्याच निर्णयांची अंमलबजावणी तातडीने करण्याचे ठरवण्यात आले. रिक्षा, फेरीवाले आणि व्यापाºयांनी ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सहकार्य करण्याचे पालिकेला व लोकप्रतिनिधींना आश्वासन दिले आहे. बेकायदा पार्किंगवर तसेच अतिक्र मण आणि फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्याधिकारी प्रकाश बोरसे, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.बदलापूर पश्चिमेकडे स्थानकाशेजारून होणारी अवजड वाहतूक बेलवली येथील जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाकडून वळवून गणेश चौक, हेंद्रेपाडा, चर्च रोडमार्गे बदलापूर गावाकडे जाईल. तसेच भाजीपाला घेऊन येणारे ट्रक सकाळी ९ नंतर स्थानक परिसरात येणार नाहीत. स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. व्यापाºयांनी दुकानाबाहेर लावलेल्या जाळ्या काढून टाकणे आदी निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान, पालिकेने तातडीने फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी बदलापूरच्या नागरिकांकडून केली जात आहे.बेकायदा रिक्षाचालकांवर कारवाई कराजे बेकायदा रिक्षा चालवून नियम मोेडत आहेत, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी रिक्षा संघटनेच्याच पदाधिकाºयांनी बैठकीत केली आहे. या बैठकीला वाहतूक निरीक्षक सुनील जाधव, किरण वाघ, सुरेश जावडेकर, नगरसेवक चेतन धुळे, सूरदास पाटील आदी उपस्थित होते.