लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली शहरांत पावसाने गुरुवारी मध्यरात्रीपासून दमदार हजेरी लावली. त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासून कामावर जाणाऱ्या नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. रेल्वे स्टेशनपर्यंत जाण्यासाठी त्यांना रिक्षा मिळवताना त्रास झाला. अडथळ्यांची शर्यत पार करत स्थानकात पोहोचल्यानंतर लोकल विलंबाने धावत असल्याचे त्यांना समजले. यामुळे त्यांची आणखी गैरसोय झाली. तर काहींनी पावसाचा अंदाज घेत माघारी फिरण्याचा पर्याय स्वीकारला.
मुंबईत झालेल्या जोरदार पावसामुळे सकाळी ७ वाजल्यानंतर सायन रेल्वे स्थानकादरम्यान रुळांवर पाणी तुंबल्याने लोकल सेवा मंदावली. त्यानंतर काही काळ लोकल सेवा ठप्प झाली होती. लोकलमध्येच अडकून पडल्याने सकाळी अनेक जण मुंबईत आपल्या कार्यालयांत पोहोचू शकले नाहीत. सकाळी काही काळ कल्याण-ठाणे दोन्ही दिशांवर लोकल सेवा सुरू होती, त्यामुळे त्या मार्गावर मुंबईच्या दिशेने गेलेले; पण लोकलमध्ये अडकलेले काही प्रवासी परतीच्या प्रवासासाठी जवळचे स्थानक गाठत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सकाळच्या वेळेत विविध स्थानकांत खोळंबलेल्या प्रवाशांचा आणि विलंबाने धावणाऱ्या लोकलचा गोंधळ दिसून आला.
कल्याण-डोंबिवलीतून रस्त्याने मुंबईच्या दिशेने जाणारे प्रवासीही कल्याण-शीळ महामार्गावर अडकले होते. तेथेही काटईदरम्यान वाहतूककोंडी झाली होती. सकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या होत्या. त्या तुलनेने दुपारी पावसाचा जोर कमी झाला होता, आकाशात मात्र काळे ढग दाटलेले होते. बाजारातही फारसा उत्साह दिसून आला नाही. पावसाचा जोर असल्याने सकाळच्या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले.
-----------------