ठाणे : मडगाव येथून सुरु झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसचे ठाण्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. एकीकडे ठाकरे गटाचे शिवसेनीक तर दुसरीकडे भाजप चे पदाधिकारी यांच्यात मात्र याठिकाणी श्रेया साठी चढाओढे पहायला मिळाली. त्यामुळे ठाणे स्टेशन परिसरात एकच गर्दी झाल्याचे दिसून आले.मंगळवार पासून मडगाव ते सीएसटी वंदे भारत सुरू करण्यात आली. मात्र ठाणे स्थानकात ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू होती. यावेळी ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे यांच्यासह संपर्कप्रमुख मधुकर देशमुख, संपर्क प्रमुख ओवळा माजिवडा नरेश मणेरा, उपजिल्हाप्रमुख कृष्ण कुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटना व मध्य रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
आम्ही केलेल्या प्रयत्नामुळे ही सेवा कोकणातील जनतेला मिळाली असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजपचे शहर अध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे, महिला अध्यक्ष मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक संजय वाघुले आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दोन्ही कडून जोरदार घोषणाबाजी आणि हाती झेंडे घेऊन शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त होता.
कोकणातून वंदे भारतची भाजपाने केली होती मागणी
सोलापूर व शिर्डीकडे जाणाऱ्या वंदे भारत सुरू झाल्यानंतर कोकणामधूनही वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी भाजपाचे आमदार प्रविण दरेकर, निरंजन डावखरे, प्रसाद लाड यांच्यासह आमदारांनी ३ मार्च रोजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली होती. त्यावेळी त्यांनी कोकणातील मार्गावर वंदे भारत सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची आज पूर्तता झाली असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. पावसाळ्याच्या काळात वंदे भारत आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे.