ठाणे : मुंबई आणि ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये दिवसा आणि रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या दिनेश यादव (३०, रा. नालासोपारा, पालघर) याला नुकतीच ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख २८ हजारांचे दागिने तसेच १५ हजारांची रोकड असा दोन लाख ४३ हजारांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत केला आहे. न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.वर्तकनगर आणि श्रीनगर पोलीस ठाण्यांच्या घरफोड्यांमधील एक आरोपी यादव हा माजिवडा पेट्रोलपंप परिसरात येणार असल्याची माहिती वागळे इस्टेट युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे आणि उपनिरीक्षक शिवाजी बेंद्रे यांच्या पथकाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे १८ मे २०१९ रोजी यादव याला बेंद्रे यांच्यासह जमादार निवृत्ती महांगरे, दिलीप तडवी, प्रदीप कदम, हवालदार मनोज पवार, विजयकुमार गोºहे, राजकुमार पाटील, दिलीप शिंदे आणि शिवाजी रायसिंग आदींच्या पथकाने अटक केली. त्याने कोपरीतील एक, वर्तकनगर पोलीस ठाण्यातील तीन, श्रीनगरमधील सात आणि मुंबईच्या गोरेगावमधील दोन अशा १३ चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. तर कोपरी, वर्तकनगर आणि श्रीनगरमधील चोरीतील ७६ ग्रॅम वजनाचे सुमारे दोन लाख २८ हजारांचे सोन्याचे दागिने आणि १५ हजारांची रोकड असा दोन लाख ४३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तो १५ चोरीच्या गुन्ह्यांमध्ये फरारी होता, अशीही माहिती समोर आली आहे. त्याच्याकडून आणखीही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अट्टल चोरटा जेरबंद; १५ घरफोड्या उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 5:45 AM