राजू काळे , भार्इंदरदुरुस्तीमुळे चर्चेत आलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-८ वरील वरसावे पुलाचे गुरुवारी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी अंतिम स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण केले. त्यामुळे लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रभारी व्यवस्थापक दिनेश अग्रवाल यांनी दिली. एनएचएआयने येथील उल्हास नदीवर १९७३ मध्ये बांधलेल्या पुलामुळे गुजरातला जाणारा पर्याय उपलब्ध झाला. परंतु, या पुलाला अवघ्या १९ वर्षांतच दुरुस्तीचे ग्रहण लागले. ३४ वर्षांत यंदाची तिसरी मोठी दुरुस्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. तत्पूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये गर्डरला तडा गेल्याने दीड वर्ष हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. जुलै २०१५ मध्ये वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर हा पूल पुन्हा महाडच्या सावित्रीमुळे दुरुस्तीच्या चर्चेत आला. ६ आॅगस्टला सर्वप्रथम ‘लोकमत’च्या वृत्तानंतर एनएचएआयने ३ सप्टेंबरपासून पुलाच्या स्ट्रक्चरल आॅडिटला सुरुवात केली. २० दिवसांपासून सुरू असलेल्या आॅडिटला गुरुवारी अंतिम स्वरूप देण्यात आले. यावेळी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या पथकाने आवश्यक यंत्रणांसह दुपारपर्यंत संपूर्ण पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट केले. त्यासाठी पुलावर एक मार्ग बंद ठेवला होता. दुसऱ्या लेनमधून वाहतूक सुरू झाल्याने वाहतुकीवर प्रचंड ताण पडल्याने कोंडी झाली. अचानक खोळंबलेल्या वाहतुकीमुळे सर्व वाहनांना वरसावे वाहतूक जंक्शनमार्गे पुलावरून तसेच ठाण्याला जाण्यासाठी सुमारे १ ते २ तास कोंडीत अडकून राहावे लागले. अंतिम स्ट्रक्चरल आॅडिट संपल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अंतिम तपासणीनंतर या पुलाचा कोणता भाग दुरुस्तीयोग्य आहे, त्याचे काम पथकातील तज्ज्ञांनी सुरू केले आहे. ते दोन दिवसांत पूर्ण होऊन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. याबाबत, अधिक माहिती देताना अग्रवाल म्हणाले, पुलाच्या कोणत्या भागाचे किती नुकसान झाले आहे, त्याची टक्केवारी निश्चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. ते प्राधान्याने पूर्ण केले जात आहे. पथकाच्या निर्णयानंतरच पुलाच्या दुरुस्तीचे काम प्रत्यक्षात हाती घेणार असून त्यावेळी मात्र पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
वरसावे पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट पूर्ण
By admin | Published: September 23, 2016 3:13 AM