- सदानंद नाईक
उल्हासनगर : शहरातील इमारतीचे स्लॅब कोसळून जीवितहानी होत असल्याने, १० वर्ष जुन्या इमारतीचे स्ट्रॅक्टर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एक आठवड्यात १५०० इमारतींना नोटिसा देणार असल्याची माहिती शहर अभियंता महेश शितलानी यांनी दिली.
उल्हासनगर महापालिकेने १४७ धोकादायक इमारतीची यादी प्रसिद्ध केली असलीतरी, यादीत नसलेल्या इमारवतीचे स्लॅब कोसळून जीवितहानी होत असल्याच्या घटना घडत आहेत. धोकादायक इमारतीच्या यादीत समाविष्ट नसलेली मोहिनी पॅलेस इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचे बळी गेल्याने, धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला. अश्या दुर्घटनेला आळा घालण्यासाठी महापालिकेने १० वर्ष जुन्या इमारतीचे सरसगट स्ट्रॅक्टर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १५०० इमारतीची यादी तयार करून इमारतीला नोटिसा देण्याचे काम सुरू झाल्याची माहिती शहर अभियंता महेश शितलानी यांनी दिली. तसेच पुढील इमारतीची यादी मालमत्ता कर विभागाकडून घेऊन स्ट्रॅक्टर ऑडिट करण्याच्या नोटिसा देणार असल्याचे शितलानी यांचे म्हणणे आहे.
गेल्या ११ वर्षात ३३ इमारतीचे स्लॅब कोसळून ३० पेक्षा जास्त जणांचे बळी गेले असून शेकडो धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी रखडली आहे. तर हजारो नागरीक जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारती मध्ये राहत आहेत. शासनाने सण २००६ मध्ये शहारातील अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी खास उल्हासनगरसाठी अध्यादेश काढला. मात्र शासन, महापालिका प्रशासन व राजकीय नेत्यांच्या भूमिकेमुळे अध्यादेशाचे काम ठप्प पडल्याचा आरोप होत आहे. धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रश्न शासनाने निकाली काढून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. ज्या धोकादायक इमारती खाली केल्या, अथवा कोसळल्या अशा इमारती मधील हजारो नागरिक इमारत पुनर्बांधणीचा प्रतीक्षेत भाड्याने राहत आहेत.
इमारतीचे स्ट्रॅक्टर ऑडिट होणारचशहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर व नागरिकांच्या सुरक्षेसाठी १० वर्ष जुन्या इमारतीचे स्ट्रॅक्टर ऑडिट करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला. त्यानुसार इमारतीची यादी तयार करून बांधकाम विभागा तर्फे टप्याटप्याने इमारतींना नोटिसा देऊन स्ट्रॅक्टर ऑडिट मागविण्यात येणार आहे. यामुळे इमारतीचे स्लॅब कोसळून जीवितहानी टळणार आहे.