ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने मुंबईतील पाच टोलनाक्यांवर हलक्या वाहनांच्या टोल माफीचा निर्णय जाहीर करताच श्रेयवादावरून आता राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. या निमित्ताने ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्यावर मनसेने जल्लोष करीत पेढे वाटले. तर शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्यामागोमाग भाजप कार्यकर्त्यांनीही टोलनाक्याकडे धाव घेतली.
टोलनाक्यावर खोळंबाटोलमाफीचा निर्णय सोमवारी सकाळी जाहीर झाल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्यावर वाहन चालकांना लाडू आणि पेढे वाटले. मनसेचे पदाधिकारी तेथून निघाल्यावर शिंदे सेनेचे पदाधिकारी तेथे पोचले आणि त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. नंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे धाव घेतली. या श्रेयवादामुळे टोलनाक्यावर सोमवारी वाहनांचा अक्षरश: खोळंबा झाला.
१२ वर्षे आमचा टोलमाफीसाठी संघर्ष सुरू होता. आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी अंगावर केसेस घेतल्या. टोलमाफी व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच सर्वप्रथम आवाज उठवला. कोणी आता काही बोलत असेल तरी खरे श्रेय राज ठाकरे यांचेच आहे.- रवी मोरे, शहराध्यक्ष, मनसे, ठाणे
हे टोलनाके आघाडी सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंबई ठाण्यातील लोकांवर लादले. त्यामुळे लोकांमध्ये असंतोष होता. २००९ साली मी पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार झालो. मी आणि शिंदे हे विरोधी पक्षाचे सदस्य असताना आम्ही आनंदनगर टोलनाक्यावर आंदोलन केले होते. पाच वर्षांपूर्वी जे वचन दिले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण करून दाखविले आहे.-प्रताप सरनाईक, आमदार, शिंदेसेना
नऊ वर्षांपूर्वी मी याच आनंदनगर टोलनाक्यावर टोलमाफीसाठी आंदोलन केले होते. सत्ताधारी पक्षात असो वा विरोधी पक्षात असो, सातत्याने टोलमुक्ती करा आणि मुंबई एन्ट्री पॉइंटला टोल लावू नका, अशी वारंवार मागणी केली. आंदोलन आणि उपोषण केले. आज खऱ्या अर्थाने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला. - संजय केळकर, आमदार, भाजप