डहाणू : सरकारने पेसा कायदा पारित तर केला पण अंमलबजावणीच्या बाबतीत तो प्रत्यक्षात गावस्तरावर राबवला नसल्याने कष्टकरी संघटनेने मंगळवारी ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराविरोधात डहाणू पंचायत समितीवर मोर्चा काढला. यावेळी डहाणू तालुक्यातील ठिकठिकाणच्या गावचे लोक सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व ब्रायन लोबो आणि मधुबेन धोडी यांनी केले. कष्टकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मोर्चा मागे घेण्यात आला.ग्रामपंचायत चळणी - सुखडआंबाची ग्रामसभा ग्रामसेवक शिरीष गावात न घेता सुखडआंबा-पाटीलपाडा येथे आयोजित करतात. शिरीष गावातील लोकांनी आग्रह करूनही त्यांचे म्हणणे ग्रामसेवकाने फेटाळल्याची तक्रार करण्यात आली.काही पेसा ग्रामसभा कोष समित्यांच्या बँक खात्यांमध्ये २०१८-१९ वर्षीचे पेसा निधी अजूनही वर्ग करण्यात आलेले नाहीत. हा निधी त्वरित ग्रामसभा कोष समित्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात यावा. काही गावांमध्ये पैसा निधी २०११ च्या लोकसंख्येनुसार वर्ग न करता मतदार यादीप्रमाणे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे काही गावांत त्यांच्या हक्कापेक्षा कमी निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी आहे.पेसा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी आदेश देऊनही सदर आदेश ग्रामसेवक धुडकावून लावतात. खरेतर पेसा कायद्यान्वये ग्रामसेवकांनी ग्रामसभेचा आदर करून या निर्णयांचे पालन करणे बंधनकारक असताना ते पाळत नाहीत. पेसा गावांच्या सभा गावकऱ्यांच्या मागणीनुसार घेतल्या जात नाहीत. सर्व पेसा गावांमध्ये त्वरित ग्रामसभा आयोजित करण्यात याव्यात. या प्रमुख मागणीसाठी कष्टकरी संघटनेने हा मोर्चा काढला.
डहाणू पंचायत समितीवर कष्टकरी संघटनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 11:04 PM