सदानंद नाईक उल्हासनगर : शहरातील विकास कामाची प्रलंबित बिले निवडणूक आचारसंहितेपूर्वी मिळण्यासाठी ठेकेदारांनी महापालिका मुख्यालयात एकच गर्दी केल्याचे चित्र आहे. अभय योजने अंतर्गत मिळालेल्या ३४ कोटींच्या उत्पन्नातून विकास कामाचे प्रलंबित बिले द्यावी. अशी मागणी आयुक्तांना ठेकेदाराकडून होत असल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगरात हजारो कोटीच्या निधीतून विविध विकास कामाने जोर पकडला असून महापालिकेवर प्रलंबित बिले वाढत आहेत. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मालमत्ता कर विभागाच्या अभय योजनेतून ३४ कोटीचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. त्या उत्पन्नावर डोळा ठेवून यातून प्रलंबित बिले देण्याची मागणी ठेकेदाराकडून होत आहे. गेल्या एका आठवड्यापासून मुख्य लेखा विभाग व आयुक्त कार्यालयात ठेकेदाराची वर्दळ वाढल्याचे चित्र आहे. थकीत बिले मिळण्यासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागत असून दुसरीकडे न झालेल्या कामाची बिले लेखा विभागात आल्याचे आरोप माजी नगरसेवक करीत आहेत. मुख्य लेखा अधिकारी किरण भिल्लारे यांनी प्रलंबित बिले मागण्यासाठी ठेकेदार कार्यालयात येत असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली. मात्र महापालिकेने ठरविलेल्या नियमानुसार क्रमवारनुसार कामाची बिले देत आहे. अशी माहिती भिल्लारे यांनी दिली आहे.
महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी ठेकेदारांची बिले देण्यात येत असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे महापालिका उत्पन्न वाढविण्यासाठी मालमत्ता कर विभागासह अन्य विभाग प्रयत्न करीत असल्याचे आयुक्त म्हणाले. ठेकेदारांनी मार्चपूर्वी विकास कामाची थगीत बिले मिळण्यासाठी राजकीय नेत्यांचा आशीर्वाद घेत असल्याचे चित्र महापालिका वर्तुळात आहे. त्यासाठी काही राजकीय पक्षाचे नेते धावपळ करतांना दिसत आहेत.