लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: नविन विद्युत जोडणीसाठी चार हजारांची लाच घेणा-या अशोक कोकाटे या कल्याणच्या विद्युत सहायकाला ठाणेलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कल्याणच्या पिसवली येथील चाळीतील घराला नविन विद्युत मीटरची जोडणी करायची होती. यासाठी संबंधित तक्रारदाराने महावितरणच्या कल्याण येथील नेतीवली कार्यालयात वारंवार पाठपुरावा केला होता. दरम्यान, हे काम करण्यासाठी कोकाटे याने चार हजारांच्या मागणी केल्यानंतर याप्रकरणी संबंधितांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. ही तक्रार मिळताच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सीमा आडनाईक यांच्या पथकाने सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास सापळा रचून चार हजारांची लाच स्वीकारतांना कोकाटेला रंगेहाथ अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.