स्नेहा पावसकरठाणे : राज्यातील महाविद्यालये १५ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरू झाली. मात्र, या सगळ्या महाविद्यालयांत मिळून विद्यार्थ्यांची १० टक्केच उपस्थिती दिसते. आठवडा संपत आला तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमीच दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोनाची भीती कायम असल्याचे जाणवते आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत होता हे लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार १५ फेब्रुवारीपासून राज्यातील महाविद्यालये सुरू झाली. महापालिका क्षेत्रातील शाळा-महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाला देण्यात आला.
ग्रामीण भागातील शाळा, महाविदयालये सुरू करण्यात आली. ठाणे जिल्ह्यातही महापालिका, नगरपरिषदांचा भाग वगळता उर्वरित ग्रामीण भागातील महाविद्यालये सुरू झाली. जिल्ह्याच्या शहापूर, मुरबाड, भातसानगर, कल्याणचा काही ग्रामीण भाग येथील मिळून सुमारे १४ ते १५ महाविद्यालये आहेत. ही जवळपास सर्वच महाविद्यालये सुरू झाली. मात्र पहिल्याच दिवशी या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची अवघी १० टक्के उपस्थिती होती. महाविद्यालयात स`निटायझर, मास्कचा वापर बंधनकारक आहे. त्याचे विद्यार्थीही पालन करत आहे. मात्र गेल्या आठ दिवसात महाविद्यालयातील उपस्थिती वाढलेली नाही.