ठाणे : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील हिमालय बिष्ट (१९) या ‘बीएमए’च्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार भास्कर विश्वकर्मा (२०) हा गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी महंमद इलियास कुटगी (२५, रा. विजापूर, कर्नाटक) या ट्रकचालकाला सोमवारी कापूरबावडी पोलिसांनी अटक केली.मुंबईतील साकीनाका येथील रहिवासी भास्कर आणि हिमालय हे दोघे मित्र १९ आॅगस्ट रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून इगतपुरी (नाशिक) येथील धबधब्यावर पिकनिकसाठी गेले होते. ते दुपारी परत निघाले आणि नाशिक-मुंबई हायवे महामार्गावरून येत असताना त्यांच्यामागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने ठाण्यातील ऋतू बिझनेस पार्कसमोर त्यांच्या दुचाकीला दुपारी ३ वा.च्या सुमारास जोरदार धडक दिली. यात भास्करला मुका मार लागला. तर, ट्रकच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली त्याचा मित्र हिमालय सापडला. त्याच्या पोट, पाठ आणि पायाला गंभीर मार लागून प्रचंड रक्तस्राव झाला. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. गंभीर अवस्थेतील भास्कर याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी मदत करण्याऐवजी ट्रकचालक कुटगी हा घटनास्थळावरून पसार झाला होता. सुरुवातीला त्याचा ट्रक ताब्यात घेऊन सोमवारी त्याला पोलिसांनी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
ठाण्यात ट्रकच्या धडकेत विद्यार्थी ठार, एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:37 PM
इगतपूरीच्या धबधब्याचा आनंद लुटून घरी परतणाऱ्या बीएमएच्या हिमालय बिष्ट या १९ वर्षीय विद्यार्थ्यांचा ठाण्यातील अपघातात मृत्यु झाला. मित्राच्या दुचाकीवरुन येतांना ट्रकने पाठीमागून दिलेल्या धडकेमध्ये दुचाकी चालक भास्कर विश्वकर्मा या घटनेत गंभीर जखमी झाला.
ठळक मुद्देट्रकचालकाला अटकइगतपुरीहून येत होते मुंबईत