डोंबिवली : निळजे गावातील रवींद्रनाथ टागोर इंग्रजी माध्यमाच्या शाळेने एका विद्यार्थ्याच्या पालकांनी फी भरली नाही म्हणून, त्याला परीक्षेपासून वंचित ठेवून, त्याला शाळेतूनही काढून टाकल्याचा प्रकार उजेडात आला आहे. यश श्रीवास्तव असे या विद्यार्थ्याचे नाव असून ‘राइट टू एज्युकेशन’अंतर्गत ज्युनिअर केजीच्या वर्गात त्याला प्रवेश दिला. मात्र, परीक्षेच्या आधी पालकांनी टर्म व मासिक फी भरली नाही, म्हणून मुलाला वर्गात घेतले जात नाही. बाहेर उभे ठेवण्याची शिक्षा शाळेकडून दिली जात आहे. या प्रकरणी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला समज देऊनही शाळेच्या व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्षच केले आहे. लोढा हेवनमध्ये राहणाऱ्या अंजली श्रीवास्तव यांचा मुलगा यश याने ‘राइट टू एज्युकेशन’अंतर्गत टागोर शाळेत ज्युनिअर केजीसाठी प्रवेश घेतला. ३ एप्रिलपासून परीक्षा सुरू झाली. मात्र, यशला परीक्षेला बसू दिले जात नाही, त्याला वर्गाबाहेर उभे ठेवले जाते, याची माहिती त्याने पालकांना दिली. पालकांनी शाळेत धाव घेतली. शाळेने सांगितले की, तुमच्याकडे टर्म व महिना फी मागितली होती. ती तुम्ही भरलेले नाही. त्यामुळे तुमच्या पाल्याला परीक्षेला बसू दिले जात नाही. हा प्रकार यशच्या पालकांनी डीवायएफआय या संघटनेचे पदाधिकारी संजय गायकवाड व अॅड. नितीन घुले यांच्याकडे कथन केला. शाळेकडे याप्रकरणी विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ‘शाळेकडे ‘राइट टू एज्युकेशन’चा निधीच आलेला नाही. त्यामुळे शाळेचा खर्च कसा भागवायचा? फी भरावी लागेल.’ एवढेच नव्हे तर शाळेने यशला शाळेतून काढून टाकले आहे.’ राइट टू एज्युकेशनचा प्रवेश ज्युनिअर केजी की इयत्ता पहिलीपासून लागू करायचा, हे ठरवण्याचा अधिकार शाळांवर आहे. ज्युनिअर केजीपासून ‘राइट टू एज्युकेशन’चे प्रवेश करण्याचा निर्णय घेणाऱ्या शाळांची संख्या सहा आहे. तर, इयत्ता पहिलीपासून या प्रकारात प्रवेश देणाऱ्या शाळांचा आकडा ४८ आहे. राइट टू एज्युकेशनमध्ये प्रवेश घेणाऱ्या शाळांकडून फीची मागणी केली जात असल्याने गायकवाड व घुले यांनी राइट टू एज्युकेशनचा लाभ न देणाऱ्या शाळांच्या विरोधात उद्या कल्याणमध्ये एक बैठक बोलवली आहे. ज्या पालकांच्या पाल्यांना विविध शाळांमधून हा अधिकार नाकारला गेला आहे, त्यांच्याविरोधात ही बैठक होणार आहे. (प्रतिनिधी)गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशालाही दाद नाही- गटशिक्षणाधिकारी ललिता दहीतुले यांच्याकडे टागोर शाळेचे प्रकरण कथन केले होते. शाळा गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशालाही दाद देत नाही, असे डीवायएफआय या संघटनेचे म्हणणे आहे. - टागोर शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या प्रकरणी ‘मी आता काही बोलू इच्छित नाही. आता मीटिंगमध्ये आहे. नंतर, माहिती सांगतो’, असे सांगून माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे.
फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला शाळेतून काढले
By admin | Published: April 09, 2017 2:46 AM