कल्याण : केडीएमसीच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शालेय साहित्य खरेदीचे पैसेच अजूनही जमा झालेले नाही. नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होऊन सहा महिने उलटले तरी महापालिकेच्या उरफाट्या कारभाराचा फटका विद्यार्थी व पालकांना बसला आहे. याप्रकरणी सरकारच्या अध्यादेशाचीच महापालिकेने पायमल्ली केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी केला आहे.कल्याण पश्चिमेतील मुस्लिम मोहल्ल्यातील महापालिकेच्या शाळेला हळबे यांनी मंगळवारी भेट दिली. तेथे काही विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी त्यांची व्यथा मांडली. बालदिनानिमित्त हळबे यांनी शालेय विद्यार्थ्याना भेट देऊन त्यांना काही भेट वस्तूंचे वाटप केले.महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याची खरदी एका कंत्राटदारामार्फत दरवर्षी केली जात होती. कंत्राटदाराकडून होणाºया खरेदीच्या प्रक्रियेला दरवर्षी विलंब होत होता. तसेच खरेदी केलेल्या साहित्याविषयी दर्जाचा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यामुळे सरकारने नवा अध्यादेश काढत शालेय साहित्याचे खरेदीचे कंत्राट काढण्याऐवजी विद्यार्थ्यांनी त्यांचे साहित्य खरेदी करावे, त्याची बिले शाळा व्यवस्थापनाकडे सादर करावी, त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा केले जातील, असे सूचित केले.हळबे यांनी सांगितले की, दीड हजार विद्यार्थ्यांनी त्यांची शालेय साहित्य व गणवेश खरेदी करून त्याची बिले मुख्याध्यापकांना दिली आहेत. या विद्यार्थ्यांच्या खात्यात त्यांच्या शालेय साहित्यासाठी झालेल्या खर्चाची रक्कम जमा झालेली नाही. शाळा सुरू होऊन सहा महिने उलटून गेले तरी अद्याप विद्यार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत. याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून टोलवा-टोलवीची उत्तरे दिली जातात. महापालिकेचे लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण यांच्या आडमुठे धोरणामुळेच विद्यार्थ्यांचे पैसे रखडलेले आहेत. आज बाल दिन साजरा केला गेला. या विद्यार्थ्यांचे पैसे किमान बाल दिनापूर्वी त्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते. लेखा विभाग, उपायुक्त, शिक्षण अधिकारी एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. मात्र, या सगळ््यात विद्यार्थी भरडले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला.
विद्यार्थ्यांची बँक खाती रिकामीच, केडीएमसीचा भोंगळ कारभार : शालेय साहित्याच्या पैशांचा पत्ताच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 1:46 AM