अंबरनाथ : सीमेवर अखंड पहारा देत देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांची शिस्त, पराक्रम आणि त्यागाची दृकश्राव्य ओळख करून देणाºया ‘तुमच्या उद्यासाठी आपला आज देणारा सैनिक’ या अनुराधा प्रभुदेसाई यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाला अंबरनाथमधील शेकडो विद्यार्थ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. अंबरनाथ नगरपालिकेतर्फे मंगळवारी दुपारी हा कार्यक्र म महात्मा गांधी विद्यालयात पार पडला. युद्धातील परिस्थिती आणि कारगिल युद्धातील शौर्य प्रभुदेसाई यांनी चित्रीकरणाच्या माध्यमातून मांडला.
अंबरनाथ पालिकेतर्फे नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कारगिल युद्धातील परिस्थिती आणि भारतीय सैनिकांचे शौर्य यावर आधारित हा कार्यक्रम होता. आपण देशात सुखात आणि आनंदात राहतो; मात्र त्याची फार मोठी किंमत सैनिक चुकवीत असतात. त्यांना आपण साथ द्यायला हवी. त्यांच्या त्यागाची आपल्याला जाणीव असायला हवी. आपल्याला सिनेमातील कलावंत, खेळाडू माहिती असतात; मात्र देशासाठी बलिदान देणाºया शूर सैनिकांची नावे मात्र फारशी कुणाला ठाऊक नसतात, याबद्दल प्रभुदेसाई यांनी खंत व्यक्त केली.
भारत-पाकिस्तान, भारत-चीन सीमारेषा, पायदळ, नौदल आणि वायुदलातील सैनिकांच्या कार्याची सचित्र ओळख अतिशय प्रभावीपणे करून दिली. कारगिल युद्ध नेमके कसे घडले, त्यात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा कसा पराक्र म केला, हे त्यांनी मुलांना सांगितले.सैनिकांची शिस्त, त्याग, चिकाटी आणि ध्येय हे गुण विद्यार्थ्यांनी अंगी बाणवावेत, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय जठार आदी याप्रसंगी उपस्थित होते.