- स्नेहा पावसकरठाणे : छडी लागे छमछम, विद्या येई घमघम... ही बाब कालबाह्यझाली असून विद्यार्थ्यांना शारीरिक इजा पोहोचेल, इतके छडीने मारू नये, हे खरं आहे. मात्र, छडीचा थोडा तरी धाक त्यांना पाहिजे, छडी नसेल तर मुलांना धाक कसला राहणार? हल्लीची काही मुलं तर फारच लाडावलेली असतात. त्यांच्यावर कसे नियंत्रण ठेवायचे, अशा शब्दांत छडी हद्दपार करण्याच्या निर्णयावर ठाण्याच्या शैक्षणिक क्षेत्रातून काहीसा नाराजीचा सूर उमटला आहे.विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचेल, अशी शिक्षा करू नये, अशी तरतूद शिक्षण बालहक्क कायद्यात आहे. त्यादृष्टीने प्राचार्य, शिक्षक, मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण विभागाने शाळांना दिले आहेत. या आदेशानंतर ठाण्याच्या शिक्षण क्षेत्रातही नाराजीचा सूर दिसून आला. अगदी मुख्याध्यापक, शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थ्यांनीही याबाबत नाराजीचा सूर लावला आहे. पट्टीने विद्यार्थ्यांना खूप मारू नये. मात्र, पट्टीचा धाक नसेल तर शिस्त लावायची कशी, त्यांना सांभाळायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला. विद्यार्थ्यांना पट्टी मारली नाही, तर एकाचवेळी वर्गात असणाऱ्या शेकडो मुलांवर नियंत्रण कसे करणार, असा सवाल शिक्षकांनी केला. अमानुषपणे मारणाºया शिक्षकांवर कारवाई करावी, मात्र छडी हद्दपार करू नये, अशी विविध मते शिक्षण क्षेत्रातून मांडली गेली.पट्टीमुळेच थोडी भीती वाटते. अभ्यास झाला नाही, मस्ती केली तर पट्टीचा मार खावा लागतो, याची भीती प्रत्येक मुलाच्या मनात असते. शिक्षकांनी पट्टीने खूप मारू नये. शिस्त लावण्यासाठी काही प्रमाणात पट्टीची भीती उपयोगी ठरते. त्यामुळे छडी शाळेतून हद्दपार करू नये.- सई डिंगणकर, विद्यार्थीछडीचा मार बसला की, मुलांचा अभ्यास पटपट होतो, ही पूर्वापार संकल्पना. पूर्वी मुलांना शाळेत ओणवे उभे करणे, पट्टी उभी मारणे अशा कठोर शिक्षाही केल्या जायच्या. मात्र, आता मुलांना मारले की, त्यांचे पालकच शिक्षकांना उलट प्रश्न विचारायला येतात. काही मुले ही घरातून अतिशय लाडावलेली असतात. अशा मुलांना शिस्त लावण्यासाठी तरी छडीचा धाक असावा. शारीरिक इजाही करायची नाही. त्यांना ओरडूनही बोलायचे नाही, मग मुलांशी वागायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आता प्रभावी शैक्षणिक साधनांचा वापर करून त्यांना शिकवावे लागणार आहे.- सुनील पाटील, मुख्याध्यापक,प्राथमिक विभाग, मो.ह. विद्यालयकाही शिक्षक मुलांना छडीने खूप मारतात. शिक्षक त्यांच्या घरगुती भांडणाचे रागही मुलांच्या शिक्षेवर काढल्याच्या घटना घडल्या आहेत. मुलांना छडीने अमानुषपणे मारू नये. मात्र, छडी शाळेतून हद्दपारही होता कामा नये. छडी नसेल तर मुलांना धाक लागणार नाही.- रूपाली शिंदे, पालक
विद्यार्थ्यांना थोडा तरी छडीचा धाक हवाच, ठाण्याच्या शिक्षण क्षेत्रात व्यक्त झाला नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 4:09 AM