लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या हाती टॅब येणार असल्याची चर्चा मागील चार वर्षे सुरू होती. त्यानुसार १५० विद्यार्थ्यांच्या हाती पहिल्या टप्प्यात टॅब पडले होते. त्यानंतर टॅबची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरले. मात्र आता तीन वर्षे उलटूनही विद्यार्थ्यांच्या हाती टॅब पडलेले नाहीत. वास्तविक पाहता कोरोनाकाळात ऑनलाइन शिक्षण सुरू असताना विद्यार्थ्यांच्या हाती टॅब असते तर त्याचा फायदा झाला असता. परंतु निधी अपुरा असल्यानेच टॅब देता आले नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. दुसरीकडे असा कोणता प्रस्तावच मंजूर झाला नसल्याचे सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
विद्यमान पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांच्या हाती टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मुंबईतील महापालिका शाळांपोठापाठ ठाणे महापालिकेतील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हातीदेखील टॅब देण्याचे निश्चित केले होते. दरम्यान, राज्य शासनाने ५ डिसेंबर २०१६ रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार विविध कल्याणकारी योजनांमध्ये वस्तुरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतर, रोख स्वरूपात थेट लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महापालिकेच्या शिक्षण विभागाने या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले. त्यानुसार २८ हजार विद्यार्थ्यांचे बॅंक खाते उघडून त्यात गणवेश असो अथवा टॅब, वॉटरबॅग, पुस्तके आदींसह इतर साहित्याची रक्कम जमा होत आहे. त्यानुसारच टॅबची रक्कमदेखील खात्यात जमा करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. दरम्यान, पहिल्या टप्प्यात पहिली आणि दुसरीच्या सुमारे १५० विद्यार्थ्यांच्या हाती टॅब दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आठवीच्या मुलांच्या हाती टॅब दिले जाणार होते. याची रक्कमही त्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाणार होती. परंतु चार वर्षे उलटूनही त्यांच्या खात्यात रक्कम नाही पडली किंवा टॅबही पडलेले नाहीत.
पावणेदोन वर्षांपासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे सर्वच कामकाज आणि शिक्षणदेखील ऑनलाइन सुरू आहे. त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेनेही ऑनलाइन शिक्षण सुरू केले आहे. त्यानुसार जे विद्यार्थी २० दिवस शिक्षण घेतील त्यांना २०० रुपये शिक्षण भत्ता दिला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु टॅबबाबत महापालिकेच्या शिक्षण विभागाला छेडले असता, टॅब खरेदीसाठी निधीच नसल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे शाळा दुरुस्तीसाठीदेखील निधी अपुरा मिळत आहे. त्यात टॅब खरेदीचा विचार केला तर प्रशासनावरच टीकेची झोड उठविली जाईल, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. दुसरीकडेच टॅब खरेदीचा निर्णयच झाला नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
.............
कोरोनामुळे महापालिकेच्या तिजोरीवर परिणाम झालेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हाती टॅब देणे शक्य नाही. मुंबईत टॅब दिलेले आहेत. परंतु ठाण्यात तशी योजना नव्हती. त्यामुळे टॅब दिलेले नाहीत.
योगेश जाणकर, शिक्षण मंडळ, सभापती
विद्यार्थी ज्या भागात राहतात, त्यातील अनेक भागात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी नाही. त्यात प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरातील मंडळींच्या हाती मोबाइल फोन असल्याने ऑनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थी घेत आहेत.
मनीष जोशी, शिक्षणाधिकारी, ठामपा