ठाणे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणेतर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘रंगोत्सव कार्यक्रम २०२३-२४’ या कार्यक्रमासाठी घेतलेल्या जिल्हा निवड चाचणीत, जिल्ह्यातील आसनगाव येथील एन. जे. बेलवले पब्लिक स्कूलचा संघ प्रथम येऊन त्यास पुणे येथील स्केर्टच्या राज्यस्तरीय सादरीकरणासाठी संधी मिळाली. हा कार्यक्रम साेमवारी पार पडला.
राज्यस्तरीय शिक्षण विभागा हा 'रंगोत्सव' नुसता रंगांचा नव्हे, तर शैक्षणिक उपक्रमांचा आणि नवनव्या अध्ययन-अध्यापन प्रयोगांचा आहे. या 'रंगोत्सव' उपक्रमासाठी या प्रशिक्षण परिषदेने राज्यभरातील शाळांकडून व्हिडीओ स्वरूपात प्रस्ताव मागविले होते. त्यातून उत्तम प्रयोगांची या रंगोत्सवाकरिता निवड करण्यात आली आहे. अध्ययन-अध्यापनात विशिष्ट कृतींचा समावेश केल्यास शिक्षण प्रक्रिया कशी प्रभावी होऊ शकते, याचे सादरीकरण या रंगोत्सवात केले आहे. शहापूर तालुक्यातील एन. जे. बेलवले पब्लिक स्कूल आसनगाव, या शाळेने इयत्ता तिसरीतील गणित विषयावर भौमितिक आकार या घटकावर आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग या अध्यापन पद्धतीचा वापर करून सादरीकरण केले आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे या सादरीकरणास सर्वोत्कृष्ट सादरीकरण म्हणून स्केर्ट पुणे येथे गौरवण्यात आले. यासाठी विद्यार्थ्याना घडवण्यात आलेल्यांमध्ये सोनाली चौधरी, मधुरा सुरोशे आदी शिक्षकांचा समावेश आहे. तर विद्यार्थांमध्ये जयाद्री भाबड, जेसिका बर्नार्ड, जान्हवी हरीनामे, धनश्री भिसे, ईश्वर दिनकर, श्रावणी शिंदे, श्रेया मोरे, स्वरूपा पानसरे आदींचा समावेश असल्याचे वास्तव येथील जेष्ठ शिक्षक सुधीर भाेईर यांनी लाेकमतला सांगितले.