ठाणे - शहापूर तालुक्यातील ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा खर्डी क्र.१’ येथील विद्यार्थ्यांना नवरात्रोत्सवाच्या कालावधीत 'जागर स्त्री प्रतिभेचे' धडे शिक्षकांनी दिले. यामध्ये आजची कर्तृत्ववान स्त्री,'मातृपूजन', राष्ट्रीय शौर्य पुरस्कार प्राप्त हाली बरफ यांच्या मुलाखतीसह 'भोंडला' या संस्कृतिजन्य कार्यक्रमात माता, पालक व विद्यार्थी एकत्रिकरण आदी उपक्रम शाळेने घेऊन नवरात्रोत्सव आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा केला जात असल्याचे या शाळेचे शिक्षक सुधीर भोईर यांनी लोकमतला सांगितले.
विद्यार्थ्यांना केवळ शालेय पुस्तकाचे ज्ञान न देता संस्कार व संस्कृतीचे जतन करण्यासाठी 'आजची कर्तृत्ववान स्त्री' हा उपक्रम राबवला. यामध्ये नवरात्रोत्सवाच्या प्रत्येक माळेला एका भारतीय कर्तृत्ववान स्त्रीचे पूजन करून माहिती दिली. यामध्ये आतापर्यंत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, आद्य शिक्षिका सावित्रीबाई,धावपट्टू पी.टी. उषा, अंतराळवीर कल्पना चावला, राजमाता जिजाबाई व गानसम्राज्ञी लता मंगेशकर आदी कर्तृत्ववान स्त्रिया विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिल्या.
'मातृपूजन'मध्ये आईने देवीपेक्षा कमी नाही, तिच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणातील कार्यक्रमात माचे चरण धुवून पूजन केले. यावेळी २१५ मातांचे पुजन झाले. शहापूर तालुक्यातील ‘राष्ट्रीय शौर्य पुरस्कार’ प्राप्त हाली बरफ यांना शाळेत निमंत्रित करून विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला. त्यांची मुलाखत घेतली. तर भोंडला' या संस्कृतीजतन कार्यक्रमात माता, पालक व विद्यार्थी यांचा एकत्रित गरबा कार्यक्रम नाविण्यपूर्व ठरला.