लोकमत न्यूज नेटवर्क, बदलापूर : शिशुवर्गातील दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याने मंगळवारपासून बंद ठेवण्यात आलेली बदलापूरमधील ती खासगी शाळा प्रशासक नेमल्यानंतर शनिवारी पुन्हा सुरू करण्यात आली. याबद्दल विद्यार्थ्यांनी, पालकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, शाळेत घडलेल्या प्रकारामुळे मुलींना शाळेत सोडायला आलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता, तर शाळा पुन्हा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत होते.
शाळेचे पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्यास शनिवारी सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी २५ टक्के विद्यार्थी शाळेत आले होते. सोमवारपासून नियमितपणे सर्व वर्ग सुरू होतील आणि शाळेतील उपस्थिती वाढेल, अशी अपेक्षा आहे.
पालकांच्या चेहऱ्यावर तणाव, मुलींची चिंताविद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आणि घरी नेण्यासाठी पालक शाळेपर्यंत आले होते. शाळा पुन्हा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होता, तर पालक तणावग्रस्त होते. शाळेत पोलिस बंदोबस्त होता. विद्यार्थ्यांना शाळेतून घरी नेण्यासाठी आलेल्या पालकांना शाळेत थेट प्रवेश दिला जात नव्हता. त्यांची ओळख पटवल्यावरच विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याची परवानगी दिली जात होती.
शाळा प्रशासनाने पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करत असल्याचा निरोप दिला. मात्र, मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीतून कोणते निर्णय घेतले आहे, त्याची माहिती शाळेने द्यावी, यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन शाळेत आलो. त्या संदर्भात आम्हाला कोणतीही माहिती अद्याप दिली नाही. त्यामुळे चिंता कायम आहे. - संदेश भालेराव, पालक.